Chandrashekhar Bawankule on Manikrao Kokate : “फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्यांना भरपाई देण्याची जबाबदारी सरकारची आहे. कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
“कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशांचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक आहे का एक रुपयाची तरी?”, असा सवाल माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला आहे. तसेच “शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे हवेत, ह्याचे-त्याचे पैसे हवेत, मग साखरपुडे करा, लग्न करा”, असंही कोकाटे म्हणाले आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, “वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध करून विरोधी पक्षाने राज्यातील जनतेशी बेईमानी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेले पाऊल जनता माफ करणार नाही. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचे पतन केले आहे”, अशी तोफही बावनकुळे यांनी डागली. “वक्फ बोर्डाच्या नवीन कायद्याचा अभ्यास करून त्यानुसार कामकाज केले जाईल. कायद्याची सविस्तर माहिती आल्याविना जिल्हाधिकारी वा महसूल विभागाची भूमिका काय राहील, हे सांगता येणार नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे. रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कुठलीही अनियमितता खपवून घेतली जाणार नाही. राज्यातील कोणत्याही रुग्णालयात पैशांची मागणी केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्यास परवाना रद्द केला जाईल”, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.
अतिक्रमण काढणार
“डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यावर तातडीने कारवाई केली जाईल. उपराजधानीतील सरकारी आणि नझूलच्या भूखंडांवरील अतिक्रमण काढण्यासाठी योजना तयार करून अभियान राबवण्यात येईल”, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.