Shivendraraje Bhosale on Uday Samant : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवेंद्रराजे यांनी उदय सामंत यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
“भाजप खासदार अशोक चव्हण, नारायण राणे आदी मंत्री महोदय मास येथे सत्कार घेवून गेले, ते सर्व पुढे मुख्यमंत्री झाले. यानंतर उदय सामंत तुम्हाला अडचणीत आणत नाही. पण आमच्या शुभेच्छा तुम्हाला आहेत”, असं वक्तव्य शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
“राष्ट्रवादीतून आपण दोघेही आमदार झालो. तुम्ही थोडा वेगळा मार्ग धरला आणि शिवसेनेतून पुढे गेलात. आम्ही राष्ट्रवादीत राहिलो अन् मागे पडलो. म्हणजे सरकार आले नाही म्हणून मागे पडलो. पण देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून संधी मिळाली आहे आणि बांधकाम खाते मला मिळाले”, अशी भावना शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली. “राष्ट्रीय महामार्ग ही सातारकरांची लाइफलाईन आहे. टोल भरतो, टोलच्या मानाने महामार्गाचा दर्जा नाही”, असंही शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.
शिवेंद्रराजे आणखी काय-काय म्हणाले?
यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय झाले असल्याने उद्योजकांचे कोल्हापूरचे हेलपाटे आता टळणार आहे, असं सांगितलं. “साताऱ्यातील एमआयडीसी विस्तारासाठी देगाव एमआयडीसीची अधिसुचना निघाली पण त्यास विरोध झाला. देगावची अधिसुचना रद्द झाली. त्यानंतर वर्णे, निगडी, जाधववाडी एमआयडीसीची अधिसुचना निघाली आहे. बागायती वगळून पडजमिनीत उपलब्ध व्हाव्यात”, अशी मागणी शिवेंद्रराजेंनी व्यक्त केली.
“सातारा-पुणे दळवळण चांगले आहे. दोन्ही शहराचे अंतर एक तासावर आले आहे. लिंब खिंड येथे आयटी पार्कसाठी जागा देण्याचा निर्णय झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात ही जागा आहे. ४६ हेक्टर जागा उपलब्ध होवू शकते. याठिकाणी आयटी पार्क व्हावा”, अशी अपेक्षा शिवेंद्रिसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.
“पशूसवंर्धनाची जागा विलासपूरला आहे. या दोन्ही जागांचा विचार व्हावा. नागेवाडीची जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असल्याने लवकर हस्तांतरीत होईल. पशूसंवर्धनची जागा थोड्या उशिरा पण हस्तांतरीत होवू शकते.
म्हसवड जिल्ह्याचाच भाग आहे. तेथे एमआयडीसी होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण साताऱ्यात पाणी, वीज यांची अडचण आहे. देगाव एमआयडीसी येथे पाण्याचा कोटा राखीव आहे. म्हसवडला पाणी न्यायचे कसे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे”, असं शिवेंद्रराजे म्हणाले.
“शेतकऱ्यांना जमिनीचे चांगले पैसे मिळतील, डेव्हलप केलेली जागेपैकी दहा टक्के जागा मिळते, या गोष्टी लोकांना माहीत नाही. जुन्या काळी जमिनी घेवून बाजूला गेले तसे होणार नाही. सातारा हा शहरानजिकचा भाग आहे. या ठिकाणी गुंठेवारी सुरू आहे. एमआयडीसी क्षेत्रात शेती होते, असे नाही. पण एमआयडीसीला देण्यापेक्षा प्लॉटिंग करण्याकडे कल वाढत आहे. प्रत्येक उद्योजकाला कंपनीचे विस्तारीकरण करायचे आहे. मात्र, मोकळ्या जागा उपलब्ध नाहीत”, अशी खंत शिवेंद्रराजेंनी व्यक्त केली.
“सातारा महामार्गाचे काम रिलायन्सकडे आहे. आम्ही टोल भरत आहोत. पण, त्या अपेक्षेप्रमाणे महामार्गाचे काम होत नाही. वेळोवेळी त्यांच्यामागे लागले की कुठे तरी डागडुजी केल्यासारखे करतात. त्यामुळे नवीन डीपीआर करून नवीन प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जुना ठेकदार बाजूला होईल”, असा दावा शिवेंद्रराजेंनी केला.