Abu Azmi Relief from arrest : औरंगजेबाची भलामण करणाऱ्या आमदार अबू आझमींना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अबू आझमींनी औरंगजेब ‘उत्तम प्रशासक’ होता असे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे संतापाची लाट पसरल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. पण आता न्यायालयाकडून त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे.
अबू आझमी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार आहेत. अबू आझमी यांनी विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला औरंगजेबावरुव वादग्रस्त वक्तव्य केले. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नसून उत्तम प्रशासक होता अशी भलामण त्यांनी केली. अबू आझमी म्हणाले होते की, औरंगजेबाबत चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. त्याची प्रतिमा सध्या देशात चुकीच्या पद्धतीनं रंगवली जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. त्यांच्या काळात भारत देशाची ओळख ‘सोने की चिडिया’अशी होती. मग त्या औरंगजेबाला वाईट म्हणावं का? असे विधान अबू आझमींनी केले होते.
अबु आझमींनी विधान घेतलं मागे
सर्वच स्तरातून विरोध वाढू लागताच अबु आझमींनी आपले विधान मागे घेतले होते. ते म्हणाले, ‘इतिहासकारांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आधारावरुन मी औरंगजेबाचं कौतुक केलं. मी महापुरुषांविषयी किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. पण माझ्या वक्तव्याची मोडतोड करुन कुणाला वाटत असेल की मी कुणाच्या भावना दुखावल्या आहेत. तर मी माझं वक्तव्य मागे घेतो. विधानसभेचं कामकाज सुरु राहायला पाहिजे. विधानसभेत खूप सारी कामं आहेत. विधानसभेला या मुद्द्यावरुन रोखणं योग्य नाही. विधानसभा रोखली तर महाराष्ट्र आणि जनतेचं खूप सारं काम थांबून राहील,’ असे स्पष्टीकरण अबू आझमी यांनी दिले.