• Wed. Apr 23rd, 2025 7:19:56 PM

    Jayant Patil : ‘तुकोबांबरोबर आता एकनाथालाही दूर सारायचा प्लॅन ‘, जयंत पाटील यांचा भर सभागृहात अजित पवारांना टोला

    Jayant Patil : ‘तुकोबांबरोबर आता एकनाथालाही दूर सारायचा प्लॅन ‘, जयंत पाटील यांचा भर सभागृहात अजित पवारांना टोला

    Jayant Patil slams Ajit Pawar : “सज्जन आता जगणार नाही, दुर्जन आता मरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, गुन्हेगारी थांबणार नाबी, रक्तपात रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. पक्षफोडी करुन आम्ही दमणार नाही, जनतेच्या सेवेत आम्ही रमणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही”, अशी कविता जयंत पाटील यांनी सभागृहात सादर केली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत चांगलाच टोला लगावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घोषित केलेल्या योजनांचा अर्थसंकल्पात उल्लेख नसल्याने जयंत पाटील यांनी अजित पवारांना टोले लगावले. “अजित पवारांनी जो अर्थसंकल्प मांडला त्या चर्चेत भाग घेण्यासाठी मी इथे उभा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री यंदा विक्रमवीर ठरले आहेत. कारण अजित पवार यांनी यंदा अकराव्यांदा अर्थसंकल्प मांडला आहे. मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतोय. त्यांचं अभिनंदन करत असताना, या अर्थसंकल्पाचं अभिनंदन करत असताना मला दुर्दैवाने सांगवं लागतंय की, बडा घर आणि पोकळ वसा”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

    “237 आमदारांचं बहुमत सरकारच्या मागे आहे. ज्यांनी बहुमत दिलं ती महाराष्ट्राची जनता फार आशा करुन त्या दिवशी टीव्ही समोर बसली होती. पण त्यांच्या पदरी निराशा आली. अनेक महापुरुषांचा उल्लेख अजित पवार यांनी केला. त्यांना मी वंदन करतोच. त्यातही त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा उल्लेख केला. अहिल्यादेवी होळकरांनी धार्मिकस्थळांना मोठी मदत केली. शेतकऱ्यांना भरभरुन मदत केली. त्यांच्या नावाचा उल्लेख केला म्हणून हा प्रश्न आहे की, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काही दिलं नाही”, असं जयंत पाटील म्हणाले.

    “अहिल्यादेवींच्या खजिन्यात पेशव्यांना कर्ज देण्याची ताकद होती. महाराष्ट्र राज्याच्या खजिन्याची आज काय अवस्था आहे. आपण आज महापालिकेला सुद्धा कर्ज देऊ शकत नाही, अशी आपली अवस्था आहे. कारण आपणच एवढं कर्ज काढलेलं आहे. 2020-21 साली आपल्यावरचं कर्ज हे 5 लाख 19 हजार कोटी होतं. या वर्षी ते 9 लाख 32 हजार कोटींपर्यंत पोहोचणार आहे”, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
    Inside Story : विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार लॉबिंग, भाजपचे 3 उमेदवार ठरले? आतली बातमी

    जयंत पाटील यांनी सादर केली कविता

    “अजित दादांनी कविता दिली. कविता महाराष्ट्र थांबणार नाही म्हणून नाही. त्यावर ती सुद्धा कविता केली आहे. सज्जन आता जगणार नाही, दुर्जन आता मरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, गुन्हेगारी थांबणार नाबी, रक्तपात रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. पक्षफोडी करुन आम्ही दमणार नाही, जनतेच्या सेवेत आम्ही रमणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, आश्वासने पूर्ण करणार नाही, विकासाची वाट धरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, रोजगार देणार नाही, शिक्षण-आरोग्याची सेवा सुधारणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही”, अशी कविता जयंत पाटील यांनी म्हटली.

    ‘तुकोबांबरोबर आता एकनाथालाही दूर सारायचा प्लॅन ‘

    “मागच्या अधिवेशनात अजित पवार यांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हटले होते. पण यावेळेस अजित दादांनी तुकोबांना थोडं दूर केलेलं आहे. प्रश्न असा आहे की, दादांनी का तुकोबांना एवढं दूर केलं आहे? ठीक आहे. हरकत नाही. पण तुकोबांबरोबर आता एकनाथालाही दूर सारायचा प्लॅन केलेला आहे. कारण एकनाथरावांनी जे काही निर्णय घेतले होते, आनंदाचा शिधा, ज्येष्ठ नागरीक तीर्थ योजना या योजनांना अर्थसंकल्पात उल्लेख दिसत नाही. त्यामुळे या अर्थसंक्लपाचं हे देखील वैशिष्ट्य आहे”, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed