कर्जबुडव्या मेहुल चोक्सी याच्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. मेहुल चोक्सी याला कॅन्सरने ग्रासल्याची माहिती त्याच्या वकिलांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात दिली आहे. चोक्सीवर सध्या बेल्जियममध्ये उपचार सुरु असल्याचं त्याच्या वकिलांनी सांगितलं आहे.
मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 13,400 कोटींचा गंडा घालून आपल्या कुटुंबासह देशातून पसार झाले होते. ईडी आणि इतर तपास यंत्रणांनी या कुर्जबुडव्या भामट्यांना आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार फरार म्हणून घोषित केलं होतं. त्याला फरार गुन्हेगार घोषित केल्याने त्याच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई तपास यंत्रणाकडून सुरु आहे. या कारवाईतून त्याची आर्थिक नाकाबंदी होऊ शकते. त्यामुळे तपास यंत्रणांकडून त्याच्या मालमत्तेवर टाच आणली जात आहे. पण दुसरीकडे मेहुल चोक्सीने कॅन्सर झाल्याचं कारण देत प्रकृती अस्वास्थामुळे आपण भारत परत येण्यास असमर्थ असल्याचं म्हटलं आहे.
तपास यंत्रणांची मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्याविरोधात जोरदार कारवाई सुरु आहे. तपास यंत्रणांनी मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांच्या भारतातील मालमत्तांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आरोपी पकडले जावेत यासाठी त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात येत आहे. पण तपास यंत्रणांच्या याच कारवाई विरोधात मेहुल चोक्सीने कोर्टात धाव घेतली आहे. आपण आजारी असल्याचं कारण देत कोर्टात हजर राहू शकत नाही. त्यामुळे आपल्याला वेळ द्यावा. तसेच संबंधित कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी चोक्सीकडून करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, कोर्टाने आरोपी मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांच्यावर कोर्टात हजर न राहण्यावरुन वारंवार ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयातच्या विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी पार पडली तेव्हा मेहुल चोक्सीच्या वकिलांनी चोक्सीला कॅन्सरचा आजार झाल्याची शक्यता वर्तवली. तसेच त्याच्यावर बेल्जियममध्ये उपचार सुरु असल्याची माहिती कोर्टाला दिली.

