मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका उपस्थित केली असता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या वक्तव्यावर कडाडून टीका केली. यावर अमित ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर शेवटच्या निवडणुकीत मला जज करा”, असं अमित ठाकरे यांनी सुनावलं आहे.
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आज कामगार नगर प्रीमियर लीग – 2025 चे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अमित ठाकरे कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना अमित ठाकरे यांना पत्रकारांनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमित ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली.
अमित ठाकरे अजित पवारांना उद्देशून काय म्हणाले?
“अजित पवार यांना प्रत्युत्तर द्यायला मी अजून खूप लहान आहे. राज ठाकरेच त्यांना उत्तर देतील. पण एक सांगतो, निवडणुकीत हरलो असलो तरी खचलो नाही. या निवडणुकीत खूप काही शिकलो. मला इतर गोष्टीचा फरक पडत नाही. माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर शेवटच्या निवडणुकीत मला जज करा”, असा टोला अमित ठाकरे यांनी अजित पवार यांना लगावला.
पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘आम्ही राजकारणाला फक्त…’
ईव्हीएमवर अमित ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
“राज ठाकरे 2017 मध्ये सर्वच नेत्यांना भेटले होते. त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनाही सांगितलं होतं की, तुमचा ईव्हीएमवर विश्वास नसेल तर बहिष्कार टाका. ईव्हीएम आलं म्हणजे प्रोग्रामिंग आलं आणि त्यामध्ये तुम्ही काहीही फसवणूक करू शकता. त्यामुळे या निवडणुकीत नाही, तर पुढच्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर निवडणूक होईल ही आशा आहे. बॅलेट पेपर हे बेटर आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. आम्ही याच मतांवर ठाम आहोत. निवडणुकांवर बहिष्कार टाकायचा नसेल तर हेच रिझल्ट तुम्हाला दिसतील. ईव्हीएमवर किती विश्वास आहे माहिती नाही. माझ्याकडे पुरावा नाही. राज ठाकरे याच्यावर स्पष्ट बोलतील. निकाल जो येतोय, तो अनपेक्षित असाच आहे”, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिली.

