• Thu. Jul 30th, 2026

    Maharashtra Politics : दिलीप वळसे पाटील शरद पवार यांच्या भेटीला, दोन्ही राष्ट्रवादीत नेमकं काय सुरु?

    Maharashtra Politics : दिलीप वळसे पाटील शरद पवार यांच्या भेटीला, दोन्ही राष्ट्रवादीत नेमकं काय सुरु?

    दिलीप वळसे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. वळसे पाटील यांनी पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीगाठी पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे खरंच काही घडामोडी सुरु आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

    ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील विलीनीकरण होणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ज्या भेटीगाठी सुरु आहेत, त्यावरुन या चर्चांना जास्त बळ मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे आज पुण्यात दोन बड्या नेत्यांची भेट झाली आहे.

    दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला

    दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पुण्यातील पवारांच्या मोदीबाग परिसरातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. शरद पवार हे आज सकाळपासून पुण्यातील मोदीबागेत आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आज मोदीबागेत येऊन शरद पवारांची भेट घेतली आहे. राज्यभरात आज गुरुपौर्णिमाचा उत्साह आहे. गुरुपौर्णिमाच्या निमित्तानेच आज सकाळपासून अनेक नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांनीदेखील गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी पवारांची भेट घेतली असू शकते. पण त्यांच्या भेटीच्या टायमिंगवरुन या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

    गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून शरद पवारांच्या नेतृ्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएत सहभागी होणार किंवा सत्तेतील राष्ट्रवादीसोबत एक होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे स्वत: शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी आधी अमित शाह आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यासोबतच अनेक भेटीगाठी घडून आल्यामुळे याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, शरद पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    गेल्या 15 दिवसांत कुणाकुणाच्या भेटीगाठी?

    दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याच्या चर्चांना बळ देणारी पहिली घटना ही मुंबईतली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली होती. तटकरे आणि पटेल ‘वर्षा’ बंगल्यावर गेल्यानंतर काही वेळाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे देखील फडणवीसांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर गेले होते. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. पण जयंत पाटील यांनी विलीनीकरण किंवा एनडीएत सहभागी होणार असल्याच्या चर्चांचं खंडन केलं होतं.

    यानंतर जयंत पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही भेट झाली. तसेच दिल्लीत शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाली. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली. सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. सुनील तटकरे यांनी आधी अमित शाह आणि नंतर मोदींची भेट घेतली. या वाढत्या भेटीगाठींमुळे शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सातत्याने होत आहेत. पण शरद पवारांच्या पक्षाकडून या चर्चांचं खंडन केलं जात आहे.