Dhanajay Deshmukh : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोन महिने होतील. मात्र, अजूनही आरोपींना काही शिक्षा होत नाहीये. तर एक आरोपी अजूनही फरार आहे. अशातच धनंजय देशमुख यांनी महत्त्वाच्या पुराव्याच्या शोधासाठी आरोपींची पुन्हा रिमांड घेण्याची मागणी आहे.
धनंजय देशमुख काय म्हणाले?
विष्णू चाटे याचा मोबाईल सापडत नसल्याच्या प्रकरणात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु केवळ गुन्हा दाखल करून भागणार नाही तर त्या मोबाईल मध्ये असलेले पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का? असा सवाल उपस्थित करत धनंजय देशमुख यांनी या मोबाईलच्या शोधासाठी सर्व आरोपींचे पुन्हा एकदा रिमांड घ्या आणि मोबाईल शोधून काढा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
विष्णू चाटेचा मोबाईल संतोष देशमुख यांची हत्या होऊन 58 दिवस झाले तरी अद्याप पोलीस यंत्रणेला सीआयडीला सापडलेला नाही. यामुळे या मोबाईल मध्ये नेमके काय होते असा प्रश्न कायम असून त्याचा शोध घेण्यासाठी आता पुन्हा एकदा या सर्व आरोपींची रिमांड घ्यावे अशीच मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे आज देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यातच असून ते या प्रकरणावर काही भाष्य करतात का हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. बीडमधील आमदार सुरेश धस आणि प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांनी हे प्रकरण लावून धरत यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा आणि एकदम खास वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला. कराडला या अवादा कंपनी खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करून अटक केली गेलीय. मात्र अद्यापही मयत सरपंच देशमुख यांचे कुटंबिया न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

