Nagpur Murder Case: बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि परिस्थिती अचानक चिघळली.
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला रक्तरंजित वळण; केक कापल्यानंतर दोन गटांमध्ये वाद(फोटो– Lipi)
नागपूर : नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुशीनगर परिसरातील एनआयटी गार्डनजवळ वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू असतानाच जुन्या वादातून झालेल्या हाणामारीने गंभीर वळण घेतले. दोन गटांमध्ये झालेल्या वादात धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने १८ वर्षीय राजवीर सोहनकुमार शर्मा याचा मृत्यू झाला. या घटनेत मध्यस्थी करण्यासाठी गेलेला त्याचा मित्र नयन सोनबरसे हादेखील जखमी झाला आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशीनगर परिसरातील एनआयटी गार्डनजवळ बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास राज इलमकर याचा वाढदिवस साजरा केला जात होता. राज आपल्या काही मित्रांसोबत केक कापून वाढदिवसाचे सेलिब्रेशन करत होता. त्याचवेळी मृतक राजवीर शर्मा हा आपल्या दोन मित्रांसह दुचाकीवरून त्या परिसरातून जात होता. यावेळी जुन्या वादातून राजवीर आणि तेथे उपस्थित काही युवकांमध्ये वाद झाला.
सुरुवातीला हा वाद काही वेळाने शांत झाला. त्यानंतर संबंधित युवक आपापल्या घरी निघून गेले. मात्र, काही वेळाने राजवीर हा आपल्या इतर साथीदारांसह पुन्हा घटनास्थळी आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला.
याचदरम्यान राज इलमकर, रोहित इलमकर आणि हनी डोंगरे यांनी कथितरित्या राजवीरवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात राजवीर गंभीर जखमी झाला. त्याचा मित्र नयन सोनबरसे हा भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला असता त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यामुळे नयनदेखील जखमी झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी राजवीर आणि नयन यांना तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर राजवीर शर्मा याला मृत घोषित केले. नयनवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती पोलिसांकडून तपासली जात आहे.
राजवीरची आई शालु शर्मा यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी राज इलमकर, रोहित इलमकर आणि हनी डोंगरे यांच्यासह अन्य आरोपींविरोधात हत्येसह संबंधित गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. वाढदिवसाच्या आनंदाच्या क्षणाला जुन्या वादाची किनार लागून त्याचे रूपांतर थेट हत्येत झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा