Raigad News : रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नागाव येथून खरेदी करुन येत असताना एक महिला बाईकवरुन खाली कोसळली पण तिने आपल्या 20 दिवसांच्या लेकराला छातीशी घट्ट धरुन ठेवलं.
नेमकं काय घडलं?
सचिन शर्मा हे आपली पत्नी गीतांजली आणि आपल्या दोन्ही मुलांसह नागावहून बाईकवरून अलिबाग येथे खरेदीसाठी आले होते. अलिबाग शहरातील स्मार्ट बाजार परिसरात पोहोचल्यानंतर त्यांच्या बाईकमध्ये अचानक बिघाड झाला आणि वाहन थांबलं. यावेळी मागे बसलेल्या गीतांजली यांचा तोल जाऊन त्या रस्त्यावर कोसळल्या. या अपघातात त्यांना दुखापत झाली आणि त्या काही काळ बेशुद्ध झाल्या.
Mumbai Crime : दारुला पैसे दिले नाहीत, मुंबईकर नातवाची 93 वर्षांच्या आजीला धमकी, लॉक लावून पळाला, वृद्धेचा करुण अंत
मात्र, अपघाताच्या क्षणीही त्यांनी आपल्या 20 दिवसांच्या चिमुकल्याला छातीशी घट्ट धरून ठेवलं. स्वतः जखमी होऊनही बाळाला काही होऊ नये, याची काळजी त्यांनी घेतली. या घटनेने उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला. घटनेची माहिती अलिबागचे माजी नगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांना मिळताच त्यांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी आपले अंगरक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते सागर पेरेकर यांना घटनास्थळी पाठवून जखमी गीतांजली शर्मा यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली.
यावेळी मोरेश्वर भगत, निखिल तबीब, भूषण मोरे, निशांत कांबळी आणि अमुलकुमार भलगट यांनीही मदतीसाठी धाव घेतली. नागरिकांच्या तत्परतेमुळे जखमी महिलेला वेळेत उपचार मिळू शकले. दरम्यान, गीतांजली शर्मा यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी भाकरवड येथील पत्रकार जीवन पाटील यांनी आपली रुग्णवाहिका विनामूल्य उपलब्ध करून दिली. तसेच जखमी महिलेच्या औषधोपचाराचा खर्चही त्यांनी स्वतः उचलला.
Pune Crime: भोंदू अशोक खरातनंतर आता पुण्यात देखील तसंच घडलं; स्वप्नील लांडेने अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवत केला अत्याचार
उत्तर प्रदेशातील घटनेची आठवण ताजी
गीतांजली शर्मा यांच्या या घटनेमुळे काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेची आठवणही ताजी झाली. पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबाची बोट तलावात बुडाल्यानंतर एका महिलेनं आपल्या लेकराला शेवटपर्यंत पोटाशी घट्ट धरून ठेवलं होतं. स्वतःचा जीव धोक्यात असतानाही लेकराला सोडून न देणाऱ्या त्या मातेची घटना त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती.
अलिबागमधील घटनेतही आईने स्वतःच्या वेदनांपेक्षा बाळाच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं. ‘आई’ या नात्याची ताकद आणि माया कोणत्याही संकटापेक्षा मोठी असते, याची प्रचिती देणारी ही घटना ठरली आहे. अपघातग्रस्त महिलेला मदत करण्यासाठी नागरिकांनी दाखविलेली तत्परता आणि पत्रकार जीवन पाटील यांनी केलेली मदत यामुळे या प्रसंगातून माणुसकीचेही दर्शन घडले.
