Ratnagiri : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पालकमंत्री असलेले नेते उदय सामंत यांच्या जिल्ह्यात राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती, रत्नागिरीत बदलत्या राजकारणाचा नेमका कोणता प्रभाव, कोकणात व महाराष्ट्रात बघायला मिळणार हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.
रत्नागिरी साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखेत शेखर घोसाळे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी येणार असल्याचे सांगितल्यानंतर या दोन्ही गटांमध्ये बुधवारी संघर्ष होण्याची चिन्हं होती. मात्र हा संघर्ष टाळून दोन्ही बाजूकडून सहकार्याची भूमिका घेण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या होमपीचवरच आता दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेना शाखेत एकत्र एक काम करणार असल्याने याची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा आहे.
‘तूझ्या गळा,माझ्या गळा, गुंफू मोत्याच्या माळा’ अशा स्वरूपाचे चित्र साळवी स्टॉप येथील रत्नागिरीच्या शिवसेना शाखेत पाहायला मिळालं आहे. रत्नागिरीमध्ये राजकीय समीकरण बदलले असून, शिंदे शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख एका जागेत बसून लोकांच्या समस्या सोडवणार आहेत.
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखेत कोण बसणार? यावरून बरेच दिवस चर्चा सुरू होती. तूर्तास या उलट चर्चेला स्वल्पविराम मिळाला आहे.
उद्धव ठाकरे गटाचे पूर्वाश्रमिचे तालुकाप्रमुख व माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्या जागेवर उपजिल्हाप्रमुख म्हणून पदावर काम करत असलेले शेखर घोसाळे यांना तालुकाप्रमुख करण्यात आलं. ही नियुक्ती उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेनेचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. त्यांनी तालुकाप्रमुख होताच पहिली घोषणा केली की साळवी स्टॉप येथील शाखेमध्ये मी बसून कामकाज करणार.
त्यामुळे कायम या शाखेत बसून लोकांची काम करणारे प्रदीप उर्फ बंडा साळवी हे कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. परंतु बंड्या साळवी यांनी स्पष्ट सांगितले की आम्ही दोघेही या शाखेत बसून लोकांचे प्रश्न सोडवणार आहोत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि शिंदे शिवसेनेचे नेते एकत्र बसून जर लोकांचे प्रश्न सोडवणार असतील तर, त्यांचा आदर्श संपूर्ण राज्यानेच घ्यावा यासाठीच ही सुरुवात करण्यात आली का? असाही प्रश्न आता अनेकांना पडला आहे.