• Wed. Mar 18th, 2026
    Tadoba Pillars History : ‘ताडोबातील खांब इंग्रजकालीन नाहीत’; शिवकालीन असल्याचा इतिहास संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांचा दावा

    ताडोबाच्या जंगलात आणि नागपूर मार्गावर दिसणारे ऐतिहासिक खांब हे ब्रिटीश किंवा गोंड राजांचे नसून भोसले कालीन असल्याचा नवा दावा इतिहास संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे.

    ताडोबातील दगडी खांब भोसले राजांनी बांधल्याचा दावा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश झाडे, चंद्रपूर: चंद्रपूर ते नागपूरला जाण्यासाठी तयार केलेला रस्ता आणि रस्ता ओळखण्यासाठी बांधलेले दगडी व विटांचे खांब हे ब्रिटिश किंवा गोंड राजांनी बांधलेले नसून, चंद्रपूर ते नागपूर येथे ये-जा करण्यासाठी भोसले राजांनी बांधले आहेत, असा दावा प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे. यातील बरेच खांब ताडोबातून गेलेले आहेत. यातील बहुतेक रस्त्यावरील खांब तुटलेले आहेत. ताडोबात मात्र हे खांब सुरक्षित राहिले आहेत।

    चंद्रपूर ते ताडोबा तलावापर्यंत वाळूच्या दगडांपासून बनविलेले हे खांब असून, नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर काही खांब विटांपासून बनविलेले आहेत. खांबाच्या वर ‘यू’ आकाराचे दगड मांडलेले आहेत. हे दगड पुढील खांबाकडे दिशा दाखवण्यासाठी विशेषतः तयार केलेले आहेत. क्वचित प्रसंगी वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी दोरी व घंटा बांधण्यासाठी त्यांचा उपयोग केला जात असावा, अशी माहिती प्रा. चोपणे यांनी दिली।

    ब्रिटिश प्रत्येक बांधकामाची देयके व माहिती लिहून ठेवत असत. या खांबांची माहिती चंद्रपूर गॅझेटियरमध्ये किंवा आर्थिक अहवालात प्रकाशित झालेली नाही. ताडोबाच्या काही वेबसाइट्सवर हे खांब गोंडकालीन असल्याचे अनेक पर्यटन संस्थांनी अंदाजाने म्हटले आहे. परंतु सर्व राजांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केल्यानंतर, चंद्रपूर ते नागपूर येथे जाण्यासाठी भोसले यांनी हे खांब बांधल्याचे पुरावे प्रा. चोपणे यांना मिळाले आहेत।

    Maharashtra TimesMumbai Crime : कुर्ती खरेदी महागात; रिफंडच्या बहाण्याने मुंबईतल्या महिलेची 98 हजारांची फसवणूक

    खांबांचा आराखडा

    हे खांब भोसले राजांनी (१७५१–१८५३) चंद्रपूरला ये-जा करण्यासाठी बांधले होते. चंद्रपूर – ताडोबा – चिमूर – उमरेड – नागपूर असा हा प्रवास असायचा. दाट जंगलात १०० मीटर अंतरावर असे खांब बांधले जात. पूर्वी शेकडो खांब बांधले गेले, परंतु ताडोबात सध्या ३५ दगडी आणि ९ विटांचे खांब उपलब्ध आहेत. उमरेडजवळ असा एक खांब आढळला आहे. नागपूर जिल्ह्यातील अनेक खांब पडलेले आहेत. त्यांची उंची जवळपास १५ फूट असून खाली जाडी सुमारे २.५ फूट आहे आणि दोन खांबांतील अंतर १०० मीटर आहे. उमरेडजवळही दोन वर्षांपूर्वी एक खांब सापडला होता।

    गोंड राजांचा इतिहास

    नागपूरचे गोंड राजे १६व्या शतकात देवगडचे राजे होते. त्यांचे नाव जाटबा होते. पुढे १७व्या शतकात भक्त बुलंद आणि चांद सुलतान होते. गोंड राजे इतर राज्यांचे हस्तक राहून राज्य करीत होते. नागपूरचे गोंड राजे चंद्रपूरला आणि चंद्रपूरचे नागपूरला ये-जा करत नसत. चंद्रपूरचे गोंड राजे सातत्याने चंद्रपूर, कळंब आणि माहूर येथेच राज्य करीत होते. ते नागपूरला कधीच जात नसत. नागपूरचे राजे वेगळे असल्यामुळे चंद्रपूरचे गोंड राजे ताडोबा, हिंगणघाट, ब्रह्मपुरी या भागात जात नसत. विशेष म्हणजे गोंड राजे विटांचे बांधकाम करत नसत; ते दगडी बांधकाम करीत. ते चंद्रपूर – ताडोबा – नागपूर हा रस्ता वापरत नसत. ताडोबा तलाव परिसरात आदिवासी राहत होते. त्यांनीच ताडोबा तलावाजवळ तारोबा हे देवस्थान उभारले. येथे पाषाणयुगीन मानव राहत असल्याचे पुरावे आजही सापडतात।

    भोसलेंचा इतिहास

    कान्होजी भोसले यांनी १७४२ पासून नागपूर येथे राज्य सुरू केले. पुढे १७५५ मध्ये नागपूरला सत्ता स्थिर झाली. रघुजी भोसले यांनी पुणे येथून नागपूर व चंद्रपूर येथे आक्रमण करून गोंड राज्यावर सुमारे १०० वर्षे राज्य केले. चंद्रपूर हे मुधोजीला देण्यात आले. त्यांनी ३२ वर्षे राज्य केले. त्यानंतर त्यांचा मुलगा व्यंकोजीने राज्य केले. त्यांनी बल्लारपूर व चंद्रपूर किल्ल्यांची पुनर्बांधणी केली तसेच रामाळा तलावाची दुरुस्ती केली. मुरलीधर मंदिरही बांधले. भोसले यांनी स्वतःसाठी राजवाडाही उभारला. रघुजीने चंद्रपूरच्या नीलकंठ शहाचा १७४८ मध्ये पराभव केला. नागपूर ते चंद्रपूर सतत प्रवास करावा लागत असल्यामुळे त्यांनी नागपूर–ताडोबा–चंद्रपूर हा मार्ग निवडला. व्यापार वाढवण्यासाठी चंद्रपूर–नागपूर रस्त्यांची गरज भासली. त्यामुळे दगडी व विटांचे खांब उभारण्यात आले. भोसलेच विटांचा वापर करत असत, तर गोंड व इंग्रज प्रामुख्याने दगडी बांधकाम करत. रघुजी भोसले ताडोबाला नियमित जात असत आणि त्यांनी ताडोबा तलावाची सुधारणा केली होती।

    Maharashtra TimesNashik Crime : डॉ. नीलेश घरी असताना मनीषा जेजुरकरांनी जीव दिला कसा? कुटुंबाला संशय, घटनास्थळी दोन सिरींजमुळे गोंधळ

    ब्रिटिशांचा इतिहास

    ब्रिटिशांनी चंद्रपूर जिल्ह्यात १८५४ पासून राज्य सुरू केले आणि १९०० पर्यंत राहिले. त्यांनी रस्ते, रेल्वे व रेस्ट हाऊस बांधले. चंद्रपूर ते नागपूरदरम्यान त्यांनी दोनच रस्ते बांधले — चंद्रपूर–वरोरा–जाम आणि चंद्रपूर–मूल–ब्रह्मपुरी. चंद्रपूर–ताडोबा–चिमूर–नागपूर हा रस्ता ब्रिटिशांचा नव्हता. ब्रिटिश प्रत्येक बांधकामाची नोंद ठेवत. त्यांच्या नोंदींमध्ये या रस्त्याचा किंवा खांबांचा उल्लेख नाही. त्यांनी फक्त भोसले यांनी तयार केलेल्या चंद्रपूर–ताडोबा मार्गाची सुधारणा केली, ताडोबा तलाव सुधारला आणि रेस्ट हाऊस बांधले. त्यामुळे ताडोबातील खांब ब्रिटिशांनी बांधले नसल्याचे स्पष्ट होते।

    ताडोबातील खांब ब्रिटिशांनी बांधले असल्याची माहिती चंद्रपूर गॅझेटियरमध्ये चुकीने दिली गेली असल्याने ती दुरुस्त करून भोसलेकालीन असा उल्लेख करावा, अशी मागणी इतिहास अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा