• Thu. Mar 19th, 2026
    Pune Crime : दहावीच्या परीक्षा केंद्रात सुरक्षा गायब? वर्गात घुसून विद्यार्थ्यावर हल्ला

    पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीच्या परीक्षेला गेलेल्या एका विद्यार्थ्यावर परीक्षा केंद्रात घुसून कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यात नेमकं चाललंय काय? कधी रस्त्यावर कोयता गँग तर कधी थेट शाळेत कोयता गँग… शहरातील गुन्हेगारी थांबायचं नावच घेत नाही. दिवसेंदिवस कोयत्याचे हल्ले जास्तच थरारक आणि धक्कादायक होतं चालले आहेत. सोमवारी (16 मार्च) पुण्यातील ओतूरमध्ये अशीच एक हादरवून टाकणारी घटना घडली. ज्याने फक्त प्रशासनच नाही तर शिक्षण व्यवस्थेवर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्न उभे केले आहेत.

    ओतूरमधील परीक्षा केंद्रात सोमवारी सकाळी दहावीचा पेपर सुरू होता. त्यावेळी सर्व सुरक्षेचे नियम तोडून एका अल्पवयीन मुलाने थेट वर्गात प्रवेश केला, आणि थेट एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला. घटना साधारण साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. विद्यार्थी पेपर लिहित असताना अचानक बाहेरून आलेल्या मुलाने कोणतीही दिरंगाई न करता एका विद्यार्थ्याला लक्ष्य केलं. त्याने मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित विद्यार्थ्याने वेळेवर हात पुढे केल्याने वार हातावर बसला आणि मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात तो जखमी झाला.

    जखमी विद्यार्थ्याने पेपर दिला

    घटनेनंतर वर्गात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी विद्यार्थ्याला त्वरित उपचार देण्यात आले. विशेष म्हणजे, उपचारानंतर त्याने पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला, यासाठी त्याला आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात आली.

    पोलिसांकडून कारवाई

    प्राथमिक माहितीनुसार, या घटनेमागे पूर्वीचा वाद कारणीभूत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी वेगाने हालचाल करत मुख्य आरोपीसह आणखी काही जणांना ताब्यात घेतले असून हल्ल्यात वापरलेले शस्त्रही जप्त केले आहे.

    हल्ल्यावेळी वर्गात पर्यवेक्षक नव्हते

    दरम्यान, हल्ला घडला त्यावेळी वर्गात पर्यवेक्षक उपस्थित नव्हता, ही बाब विशेष लक्षवेधी ठरते. यामुळे परीक्षा केंद्रातील देखरेख व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रवेश प्रक्रियेत अधिक काटेकोरपणा आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा