Jalna News: जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत दीड लाखापेक्षा अधिक क्विंटल तुरीची आवक झाली आहे. तुरीला सरासरी साडेसात हजार रुपये क्विंटल असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव मोहन राठोड यांनी दिली.
खरिपात तुरीचे उत्पादन समाधानकारक असल्याने तुरीचे भाव स्थिरावले आहेत. पुढील काळातसुद्धा तुरीचे भाव सात हजार ते सात हजार ५०० पर्यंत स्थिर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ‘तीन महिन्यांपूर्वी तूर साडेबारा हजार रुपयांवर पोहोचली होती. जुनी तूर सध्या फार शिल्लक नाही. नवीन तूर दररोज सहा ते आठ हजार क्विंटल बाजारात येत आहे. नवीन तूर दाखल झाल्यानंतर सुरुवातीला भाव चढले होते; पण आता कमीत कमी सहा ते सात हजार सहाशेपर्यंत आहेत; पण बाजार स्थिर राहणार, असे आडत व्यापारी जुगलकिशोर भक्कड यांनी सांगितले. ‘राज्य सरकारकडून ‘नाफेड’ची तूर खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. केंद्र सरकारकडून तूर आयात करण्यास एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आल्याचा बाजारावर परिणाम होत आहे. यामुळेच तुरीचे भाव पडले आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे,’ अशी प्रतिक्रिया व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच यांनी दिली.
दारुच्या नशेत ‘ट्रूथ अँड डेअर’, पुण्यात तरुणीवर मित्राकडून अत्याचार, बाथरुममध्येच…
‘सध्या बाजारात येणाऱ्या तुरीत ओलावा १६ टक्क्यांहून अधिक आहे; तसेच हिरवा दाणा १२ टक्क्यांहून जास्त आहे. यामुळे जास्त भाव जास्त मिळत नाही, अशी माहिती बजरंग दाल मिलचे संचालक अमित मगरे यांनी दिली. ‘तूर डाळ सध्या एकशे दहा ते एकशे चाळीस रुपये किलो आहे. भविष्यात फेब्रुवारी महिन्यात हे भाव वीस ते पंचवीस रुपयांनी उतरतील, अशी शक्यता निर्माण होईल,’ असेही मगरे म्हणाले.
Eknath Shinde: वीसचे दोन आमदार व्हायला वेळ लागणार नाही, उपमुख्यमंत्री शिदेंचे ठाकरेंवर टीकास्त्र
‘जिल्ह्यात सरासरी ५० हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात आलेली असून, उत्पन्न साधारण दहा क्विंटल प्रती हेक्टर आहे. गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक परिस्थिती आहे,’ असे मत जिल्हा कृषी अधीक्षक गहिनीनाथ कापसे यांनी व्यक्त केले. तुरीचे वरण हे घरखांचे बजेट ठरवणारे असते. गेल्या वर्षांपासून तुरीच्या चढलेल्या भावाने वैतागून गेलेल्या गृहिणींना यंदा किंचित दिलासा मिळेल, असे वातावरण आहे.