Jalgaon Train Accident: रेल्वे अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे प्रवासी घाबरले. जीव वाचवण्यासाठी त्यांनी ट्रेनबाहेर उड्या टाकल्या.
रेल्वे अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली. दुर्घटनेत जखमी झालेल्यांचा मदतीसाठी आक्रोश सुरु झाला. आप्तस्वकीय गमावलेल्यांच्या हुंदक्यांनी परिसर शोकसागरात बुडाला. रेल्वे रुळांच्या परिसरात अनेकांचे मृतदेह पडलेले होते. हे दृश्य काळजाचा थरकाप उडवणारं होतं. रुळांच्या दोन्ही बाजूंना मृतदेहांचे तुकडे पसरलेले होते. आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावणाऱ्यांचा आक्रोश सुरु होता. त्यांचा आक्रोश, त्यांचे अश्रू पाहून सगळेच हेलावले.
Jalgaon Train Accident: ट्रेननं ब्रेक दाबला, ठिणग्या उडताच प्रवाशांच्या धडाधड उड्या; प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार
एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळी एक तीव्र वळण होतं. त्यामुळेच पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारुन शेजारच्या रुळांवर जाऊन बसलेल्या प्रवाशांना त्याच रुळांवरुन येत असलेल्या बंगळुरु एक्स्प्रेसचा अंदाज आला नाही. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानं भेदरलेल्या प्रवाशांनी उड्या टाकल्या. हेच प्रवासी पुढच्या काही मिनिटांमध्ये शेजारच्या रुळांवर भरधाव वेगात आलेल्या बंगळुरु एक्स्प्रेसच्या खाली आले.
पुष्पक एक्स्प्रेसच्या B4 बोगीच्या चाकांमधून ठिणग्या उडाल्यानं ट्रेन थांबवण्यात आली. त्याच सुमारास ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. थांबलेल्या पुष्पक एक्स्प्रेसमधून अनेक प्रवाशांनी खाली उड्या टाकल्या. त्याचवेळी मनमाडहून भुसावळला जाणारी दुसरी एक्स्प्रेस शेजारच्या रुळांवर आली. या एक्स्प्रेसनं पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या टाकून रुळांवर बसलेल्या प्रवाशांना चिरडलं. यात ११ जणांचा मृत्यू झाला.
Jalgaon Train Accident: जळगावात ट्रेनला आग लागल्याच्या भीतीनं प्रवाशांच्या उड्या; दुसऱ्या ट्रेननं ७ ते ८ जणांना उडवलं
पुष्पक एक्स्प्रेसच्या प्रवाशांना बंगळुरु एक्स्प्रेसनं चिरडल्याची माहिती नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिली. ‘पुष्पक एक्स्प्रेसचे प्रवासी रुळांवर बसलेले होते. त्यावेळी त्या रुळांवरुन बंगळुरु एक्स्प्रेस आली. त्या ट्रेनखाली प्रवासी चिरडले गेले. पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्यासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहे,’ अशी माहिती गेडाम यांनी दिली.