• Tue. Jan 21st, 2025

    ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 21, 2025





    मुंबई, दि. 21:- संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ कीर्तनकार, आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू डॉ. किसन महाराज साखरे यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला आहे. अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि संत साहित्य यांचा प्रचार-प्रसार करताना त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात, डॉ. किसन महाराज साखरे यांनी संत साहित्याचा गाढा अभ्यास करून कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजाचे आध्यात्मिक प्रबोधन केले. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत यांसारख्या ग्रंथांवर भाष्य करत संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.

    ज्ञानेश्वरीच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संत विचारांची प्रभावी मांडणी केली. श्रीमद्भगवद्गीता व संत साहित्य प्रचारासाठी देशभरात त्यांनी ज्ञानयज्ञाचे आयोजन केले. त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे महाराष्ट्राने एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व गमावले आहे. साखरे महाराज यांच्या निधनामुळे अध्यात्म, शिक्षण आणि संत साहित्य क्षेत्राची अपरिमित अशी हानी झाली आहे. साखरे महाराजांच्या स्मृती आणि विचार आपल्याला नेहमीच प्रेरणा देतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

    000







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed