Pune Shirur Firing On Businessman: पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. येथे एका गैरसमजूतीमुळे आरोपीने व्यावसायिकावर गोळी झाडली. या घटनेत व्यावसायिक थोडक्यात बचावला आहे.
या प्रकरणी कृष्णा वैभव जोशी (रा सरदार पेठ, शिरूर ता शिरूर जि पुणे) याच्या विरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी महेंद्र मोतीलाल बोरा (वय ५३ वर्ष, धंदा-किरणा दुकान, रा. सरदार पेठ, शिरूर ता शिरूर जि पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २० जानेवारी रोजी रात्री साडे नऊ वाजता घडली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरूर शहरातील सरदार पेठ येथे असणाऱ्या स्वीटी प्रोव्हिजन स्टोअर्स समोर असणाऱ्या हलवाई चौक ते मारुती आळी रोडवर फिर्यादी महेंद्र बोरा यांनी आरोपी विरुद्ध इन्कम टॅक्सला सुमारे चार वर्षापूर्वी अर्ज केल्याचा गैरसमज झाला. त्या गैरसमजातून आरोपीने दारू पिऊन येऊन फिर्यादी यांच्या दुकानजवळ येऊन त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने स्वतःकडे असलेले पिस्तूल बाहेर काढून ‘मी तुला आज जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत पिस्तूलाचा खटका दाबला. परंतु फिर्यादी यांनी त्याचा हात बाजूला घेतला त्याच्या हातून पिस्तूल बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत रोडवर गोळी चालली. त्यानंतर आरोपीने पुन्हा तक्रारदार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि घटनास्थळावरून आरोपीने पळ काढला.
या प्रकरणी फिर्यादी यांनी शिरूर पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली. या प्रकरणी शिरूर पोलीस अधिक तपास करत आहेत. तर, या घटनेने परिसरात मात्र तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पुण्यात काहीच दिवसांपूर्वी चाकण येथे गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा पुणे जिल्ह्यात गोळीबार झाल्याने कायदासुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.