Akshay Shinde Encouter Verdict : बदलापूरमधील शालेय मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला होता. मात्र हा बनावट एन्काऊंटर असल्याचे समोर आले आहे. यावर आता अक्षयच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षयचा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. अनेकांनी या एन्काऊंटरचे स्वागत केले होते. मात्र याचवेळी विरोधकांकडून याचा कडाडून विरोध करण्यात आला होता. तर एन्काऊंटर पूर्वनियोजित असल्याचा आरोपही करण्यात आला. आरोपी दोषी ठरल्यास त्याला शिक्षा देण्याचे काम हे न्यायालयाचे आहे, पण पोलिसांनी कायदा हाती घेतल्याची चूक विरोधकांनी दाखवून दिली होती. आता न्यायालयीन समितीच्या अहवालातूनही हा एन्काऊंटर फेक असल्याचे समोर आले आहे. यावर अक्षय शिंदेच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझा मुलगा निर्दोष होता,’ असे विधान त्यांनी केले आहे.
Badlapur Accuse Encounter : अक्षय शिंदेवर बचावासाठी गोळ्या झाडल्याचा दावा संशयास्पद, मृत्यूला पोलीसच जबाबदार, धक्कादायक निष्कर्ष समोर
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अक्षयची आई म्हणाली, माझा मुलगा निर्दोष होता त्याने गुन्हा केलाच नव्हता. आता ज्यांनी गुन्हे केले आहेत, कोर्टाने आदेश दिल्यानुसार त्यांना सजा मिळणारच हे माझं म्हणणं आहे. माझ्या मुलाने गुन्हा केलाच नाही, माझा मुलगा खरा होता आणि हेच सत्य आहे. आई म्हणून माझा त्याच्यावर विश्वास आहे. माझ्या मुलावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर त्याचा एन्काऊंटर केला, त्या लोकांनी माझ्या मुलाला मारून टाकलं, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. तर कोर्टाच्या निर्णयाबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले आहे.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांना हा मोठा धक्का आहे. एन्काऊंटर हा बनावट असल्याचे न्यायालयीन समितीने अहवालात स्पष्ट केले आहे. चकमकीदरम्यान त्यावेळी उपस्थित ५ पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला आणि एन्काऊंटरचा बनाव रचला. त्यामुळे हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असेही अहवालात नमूद आहे. याआधारे न्यायालयानेही एन्काऊंटर बनावट असल्याचा निर्णय सुनावला. यावर अक्षयच्या आईने समाधान व्यक्त केले.