Rani Baug Mayor Bungalow: येत्या काही महिन्यांत महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्ष बैठका घेत आहेत. आता मुंबई महापालिकाही कामाला लागली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भायखळ्यातील राणीच्या बागेच्या आवारात असलेल्या महापौर बंगल्याची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हायलाइट्स:
- प्रशासकीय कार्यकाळात वापरच नसल्याने दुरवस्था
- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगल्याची दुरुस्ती
- निविदा काढून नव्या कंत्राटदाराची नियुक्ती
राणीच्या बागेतील हा बंगला साधारण सहा हजार चौरस फुटांचा आहे. या बागेतील पाटणवाला मार्गाला समांतर असलेला व सागवान लाकडाची रचना असलेला हा कौलारु बंगला आहे. या बंगल्याचा वापर होत नसल्याने काही ठिकाणी वाळवी लागली असून काही भाग जीर्ण झाला आहे. लाकडी संरचनेच्या दुरुस्तीची कामे तातडीने करणे आवश्यक आहे. तसेच मंगलौरी कौलांच्या खाली असलेले प्लायवूड वाळवी व पावसाच्या पाण्यामुळे जीर्ण झाले असून तेही त्वरित बदलण्याची गरज आहे.
हा बंगला महापालिकेच्या हेरिटेज विभागाच्या अखत्यारित येतो. बंगल्याची स्थिती पाहता आणि येत्या काळात हेच महापौरांचे निवासस्थान होणार असल्याने त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हे काम एका कंत्राटदरालाही सोपविले आहे. या कामासाठी सुमारे ६५ लाखांचा खर्च असून सहा महिन्यांत काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. कंत्राटदराकडून संरचनात्मक दुरुस्ती, कौलांच्या आधार लाकडाची दुरुस्ती, पेटिंग व पॉलिशिंगची कामे, वाळवीप्रतिरोधक कामे केली जाणार आहेत.
महत्त्वाची कामे करण्याआधी चार दिवसांपूर्वीच या बंगल्याची जुनी कौले काढण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बंगल्याचे नुकसान होऊ नये, याची खबरदारी महापालिकेच्या हेरिटेज विभागाकडून घेण्यात येत आहे. या कंत्राटदाराने याआधी याच महापौर बंगल्याच्या शेजारीच असलेल्या अतिरिक्त आयुक्त यांचे सेवानिवासस्थान असलेल्या बंगल्याचेही नूतनीकरण केले आहे. त्यामुळे याच कंत्राटदारास महापालिकेने काम सोपविले आहे.