Jalgaon Guardian Minister : जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार यावर विविध चर्चा रंगल्या होत्या. अखेर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या रस्सीखेचमध्ये शिवसेना शिंदे गटाने जळगाव पालकमंत्री पदावर वर्चस्व राखले आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन एक ते दीड महिना उलटून गेला होता तरी पालकमंत्री काही ठरत नव्हते. यामध्येच पालकमंत्री पदावरून अनेक जिल्ह्यांत रस्सीखेच देखील पाहायला मिळाली. जळगावचे देखील पालकमंत्री कोण होणार यावर चर्चा रंगल्या. आता अखेर जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गुलाबराव पाटील यांची वर्णी लागली आहे.
जिल्ह्यांचे पालकमंत्री नियुक्त होत नसताना विरोधकांनी सत्ताधारी सरकारवर टीका केली. अनेक प्रलंबित कामे मार्गी लागत नव्हते यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले होते. खरंतर मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर लागलीच पालकमंत्र्यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. मात्र यावेळी प्रथमच राज्य सरकारला पालकमंत्री नियुक्त करण्यासाठी विलंब झाला आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि यानंतर मंत्रीपदांचा शपथविधी होऊन देखीलअद्याप पालकमंत्री पदांची यादी जाहीर झालेली नव्हती. यातच जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री बदाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. गेल्या अनेक वर्षापासून पालकमंत्री पदाची धुरा ही गुलाबराव पाटील यांच्याकड़े असली तरी आता भारतीय जनतापक्षातर्फे याचा दावा करण्यात आलेला होता. यामुळे पालकमंत्री पद नेमके कोणाला मिळणार याबाबत मोठीच उत्सुकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.
यामुळे आता पाच वर्षापेक्षा पुढील कालावधीत देखील गुलाबराव पाटील यांच्या कडेच जळगाव जिल्ह्याची धुरा असेल हे आता स्पष्ट झालेले आहे. दरम्यान जिल्ह्यातील मातब्बर नेते तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याची महत्त्वाची धुरा सोपवण्यात आलेली आहे. यामुळे यादी जाहीर होण्याआधीच मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिक येथे जाऊन आढावा बैठक देखील घेतली होती तसेच होणाऱ्या 2017 च्या कुंभमेळ्या साठी चर्चा देखील करण्यात आली.