मुंबई दि 18 :- टाटा मुंबई मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) मॅरेथॉन मार्गावर स्वच्छतेची पूर्णतः खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.
टाटा मुंबई मॅरेथॉनच्या मार्गावरील हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी 17 जानेवारी 2025 रोजी आवाज फाउंडेशनने केलेल्या निरीक्षणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) ने स्पष्टीकरण दिले आहे. आवाज फाउंडेशनने Atmos sensor-based monitors चा वापर केला असून, ही उपकरणे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) च्या मान्यताप्राप्त निकषांनुसार नसल्याचे MPCB कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
CPCB मान्यताप्राप्त पद्धतींचा अभाव
MPCB च्या म्हणण्यानुसार, Atmos सेन्सर-आधारित मॉनिटर्स हे फक्त सूचक आकडेवारी देऊ शकतात, पण नियामक-स्तरीय हवेच्या गुणवत्तेचे अचूक मोजमाप करण्यासाठी CPCB ने निर्देशित केलेली उपकरणे व पद्धती आवश्यक आहेत.
हवामान व स्थानिक घटकांचा परिणाम
आवाज फाउंडेशनने 17 जानेवारीला केलेली मोजमापे मॅरेथॉनच्या दिवशी (19 जानेवारी) असलेल्या हवामानाशी तंतोतंत जुळतीलच असे नाही. वाऱ्याचा वेग, तापमान आणि आर्द्रता यासारख्या घटकांमुळे हवेची गुणवत्ता बदलू शकते.
याशिवाय, 17 जानेवारी रोजी वाहतूक, बांधकामे आणि स्थानिक प्रदूषण स्रोतांमुळे झालेली उत्सर्जने मॅरेथॉनच्या दिवशी वेगळी असण्याची शक्यता आहे.
मॅरेथॉनसाठी नियामक मॉनिटरिंगची व्यवस्था
मॅरेथॉनसाठी नियामक-स्तरीय हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण CPCB मान्यतांनुसार करण्यात येणार असल्याचे MPCB ने स्पष्ट केले आहे. या निरीक्षणाद्वारे मॅरेथॉनदरम्यानची वास्तविक आणि अचूक माहिती मिळेल.
हवेच्या गुणवत्तेसाठी MPCB चे पाऊल
MPCB ने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ला मॅरेथॉन मार्गावर स्वच्छतेची पूर्णतः खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.
शनिवारी संध्याकाळपासून रस्त्यांचे झाडणे टाळण्याचे आणि बांधकामे नियमांचे पालन करत असल्याचे सुनिश्चित करण्यास सांगण्यात आले आहे.
आज (18 जानेवारी) संध्याकाळपासून MPCB कडून 8 मोबाइल हवेच्या गुणवत्तेचे मॉनिटरिंग व्हॅन तैनात केल्या जाणार आहेत.
जनतेसाठी आवाहन
MPCB ने नागरिकांना आवाहन केले आहे की, हवेच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करताना प्रमाणित व मान्यताप्राप्त स्रोतांवरच विश्वास ठेवावा आणि अशास्त्रीय पद्धतींवर आधारित निष्कर्ष काढणे टाळावे. असे MPCB तर्फे कळविण्यात आले आहे.