राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. तर महाविकास आघाडीचे पुरतं पानिपत झालं. विधानसभेत मोठ्या पराभवानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी स्वतंत्र लढण्याच्या मानसिकतेत असल्याचं चित्र आहे.
पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. तर महाविकास आघाडीचे पुरतं पानिपत झालं. विधानसभेत मोठ्या पराभवानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी स्वतंत्र लढण्याच्या मानसिकतेत असल्याचं चित्र आहे. याला दुजोरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या ‘एकला चलो रे’च्या नाऱ्याने मिळाला.
एकीकडे संजय राऊत हे स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत असताना आता पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी मात्र महाविकास आघाडीत लढलो तर चांगलं यश मिळू शकतं असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शिवसेनेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढण्यासंदर्भात दोन मतप्रवाह दिसून येत आहेत.
दादांचा साहेबांना धक्का, आमदार गळाला लावला; भाजप नेत्याला घाम फोडणाऱ्या नेत्याची घरवापसी
आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. आम्ही नागपूर आणि मुंबईसह सर्व महापालिका स्वबळावर निवडणूक लढवू, असं संजय राऊत म्हणाले होते. मात्र संजय राऊत यांच्या या भूमिकेच्या अगदी विरोधात वसंत मोरे यांनी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
पुण्यामध्ये ज्या वेळेस शिवसेनेची बैठक झाली, त्यावेळेसएक लोकप्रतिनिधी म्हणून पुणे शहरातील महापालिका निवडणूक आपण महाविकास आघाडी म्हणून लढवली पाहिजे अशी भूमिका मी मांडली होती. ज्यावेळेस चारचा प्रभाग होतो, त्यावेळेस शिवसेनेची ताकद कुठेतरी कमी पडते. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून लढलो तर पक्षाला त्याचा फायदा होईल अशी माझी भूमिका आहे. प्रत्येक पक्षात दोन मतप्रवाह असतात, एक लोकप्रतिनिधींचा आणि एक कार्यकर्त्यांचा. कार्यकर्त्यांना आपल्याला संधी मिळावी अशी भूमिका असते. लोकप्रतिनिधी मध्ये आपल्याला इतर पक्षांचा फायदा होईल ही भूमिका असते. त्यानुसार एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका मी मांडली आहे, असं वसंत मोरे म्हणाले.
माणुसकीला काळीमा! छ. संभाजीनगरात अपघात, चौघांचा मृत्यू; रुग्णवाहिकेत संतापजनक प्रकार
मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने आपण या निवडणुका स्वबळावर लढवायला हव्यात अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडलेली आहे. संजय राऊत यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचं समोर आलं. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेना झोपलेली असल्याचं वक्तव्य करत महाविकास आघाडीमधील दुरावा वाढल्याचं एका अर्थानं स्पष्ट केलं होतं. मात्र आता वसंत मोरे यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीचं नाही, तर शिवसेनेत सुद्धा निवडणुका लढवण्यासंदर्भात दोन मतप्रवाह असल्याचं स्पष्ट झालं आहे.