• Tue. Jan 14th, 2025

    इस्कॉन ट्रस्टने थकवले सिडकोचे कोट्यवधी रुपये; पंतप्रधानांच्या हस्ते उद्या होणाऱ्या मंदिराच्या लोकार्पणावर प्रश्नचिन्ह

    इस्कॉन ट्रस्टने थकवले सिडकोचे कोट्यवधी रुपये; पंतप्रधानांच्या हस्ते उद्या होणाऱ्या मंदिराच्या लोकार्पणावर प्रश्नचिन्ह

    CIDCO Navi Mumbai : खारघर येथील इस्कॉन ट्रस्टद्वारे उभारण्यात आलेल्या श्री श्री राधा मदनमोहन मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, बुधवारी, १५ जानेवारी रोजी होणारे लोकार्पण सिडकोकडून प्राप्त होणाऱ्या भोगवटा प्रमाणपत्रावर अवलंबून आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    CIDCO21

    मनोज जालनावाला, नवी मुंबई: खारघर येथील इस्कॉन ट्रस्टद्वारे उभारण्यात आलेल्या श्री श्री राधा मदनमोहन मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, बुधवारी, १५ जानेवारी रोजी होणारे लोकार्पण सिडकोकडून प्राप्त होणाऱ्या भोगवटा प्रमाणपत्रावर अवलंबून आहे. जोपर्यंत सुधारित बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त होत नाही, तोपर्यंत इस्कॉनचे अनधिकृत बांधकाम नियमित होणे शक्य नाही. पंतप्रधानांच्या दौऱ्याला एकच दिवस शिल्लक असल्यामुळे सिडकोसह शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इस्कॉन मंदिराला कुठल्याही परिस्थितीत आज, मंगळवारी भोगवटा प्रमाणपत्र मिळवून देण्याचा आटापिटा सुरू आहे. याशिवाय इस्कॉन ट्रस्टने अतिरिक्त भाडेपट्ट्यापोटी सिडकोचे कोट्यवधी रुपये थकवले आहेत.

    मंदिराचे अनधिकृत बांधकाम अधिकृत करून घेण्यासाठी सिडकोच्या इमारत परवानगी विभागाने दंडासहीत सुमारे दोन कोटी रक्कम भरण्याची नोटीस इस्कॉन ट्रस्टला बजावली होती. बांधकाम परवानगी घेताना नमूद केलेल्या चटई क्षेत्रापेक्षा अधिकचे बांधकाम केल्यामुळे ट्रस्टला अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळाची रक्कम सिडकोस भरावी लागणार आहे. याशिवाय या भूखंडावर विनापरवानगी अतिरिक्त बांधकाम केल्यामुळे दंडाची रक्कमही सिडकोकडे भरावी लागणार आहे. मात्र, आपण केलेल्या चुकीच्या कामाची वेळीच दुरुस्ती करण्याऐवजी पंतप्रधानांना मंदिराच्या लोकार्पणासाठी बोलावून सिडको व राज्य सरकारकडून हव्या तशा सवलती पदरात पाडून घेण्याचा इस्कॉन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा डाव असल्याची चर्चा सिडको वर्तुळात सुरू आहे.
    पंचवटीत बापलेकाचा संशयास्पद मृत्यू; आत्याची प्रकृती चिंताजनक, घटनेनं परिसरात खळबळ
    सिडकोद्वारा २५ ऑक्टोबर २०११ रोजी इस्कॉन ट्रस्टला मंदिराची बांधकाम परवानगी देण्यात आली. मार्च २०१५पर्यंत ट्रस्टला संबंधित भूखंडावर बांधकाम पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र, विहित वेळेत बांधकाम पूर्ण न करता ट्रस्टने एप्रिल २०१५पासून काम करण्यासाठी सिडकोकडून मुदतवाढ न घेताच डिसेंबर २०२४पर्यंत अतिरिक्त भाडेपट्ट्यापोटीची ७ कोटी ४० लाखांची रक्कम थकवल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, अतिरिक्त भाडेपट्टा रकमेत ५० टक्के सवलत देण्याची सिडकोची अभय योजना सुरू असल्यामुळे आता ४ कोटी ६० लाख रुपये जीएसटीसह सिडकोकडे भरणे इस्कॉन ट्रस्टला अनिवार्य आहे.

    यासंदर्भात इस्कॉन ट्रस्टचे पदाधिकारी सूरदास प्रभू यांच्याकडे सिडकोकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले का याबाबत विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्यास असमर्थता दर्शवत उद्या माहिती देतो, असे सांगितले. इतर माहिती देण्यास त्यांनी नकार दर्शवला.
    टोल वाचला, आयुष्य गमावलं! अपघात का झाला? काही मिनिटांपूर्वी टेम्पोतून उतरलेल्या तरुणाने सांगितलं मोठं कारण
    तर या संदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला‌. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

    नगरविकासमंत्र्यांकडे धाव
    सिडकोने अतिरिक्त भाडेपट्ट्यापोटी आकारलेली ४ कोटी ६० लाख रुपये ही थकित रक्कम माफ करण्याची मागणी इस्कॉन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी नगरविकास विभागाचे मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी आज, मंगळवारी नगरविकास विभागाकडून आदेश मंजूर होण्याची शक्यता आहे.
    Mahakumbh 2025: प्रयागराजमध्ये भक्तिसागर! महाकुंभमेळा सुरू; पहिल्या दिवशी १.६५ कोटी भाविकांनी केले स्नान
    सेवाशुल्काचे साडेपाच लाख रुपये देणे
    इस्कॉन ट्रस्टने सिडकोचे सेवाशुल्कापोटी तब्बल साडेपाच लाख रुपयेही थकविले आहेत. सदर रक्कम ट्रस्टने आता भरल्यास त्यावर अभय योजनेंतर्गत ५० टक्के सवलत प्राप्त होऊन इस्कॉन ट्रस्टला ३ लाख ६६ हजार रुपयांचा भरणा करावा लागणार आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed