Sanjay Raut On Congress: आजच्या सामनाच्या अग्रलेखात इंडिया आघाडीतील काँग्रेस पक्षावर टीका करण्यात आली आहे. याबाबत आता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं की त्यामध्ये इंडिया आघाडीचं मन मोकळं केलं आहे. घटकपक्षाच्या भावना काय आहेत त्या व्यक्त केल्या आहेत.
संजय राऊत काय म्हणाले?
“इंडिया आघाडी अधिक मजबूत व्हावी, टिकावी आणि देशाच्या राजकारणात अधिक पुढे जावी, ही आमच्या सर्वांची इच्छा आहे, पण गेल्या काही दिवसांपासून आमचे काही घटकपक्ष या भूमिकेत आहेत की, संवाद तुटला आहे. संवाद तुटला तर कुठलीच आघाडी यशस्वी होत नाही. शिवसेना भाजप युतीमध्ये संवाद तुटला म्हणून युती तुटली, २०१९ मध्ये योग्य संवाद झाला नाही म्हणून युती तुटली”, असं संजय राऊत म्हणाले.
“इंडिया आघाडीमध्ये ३० पक्षांशी संवाद ठेवण्यासाठी काही जबाबदार नेत्यांची नियुक्ती झाली पाहिजे हे उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या बैठकीत अनेकदा सांगितलं आहे. इतर नेत्यांनी विषय मांडला. ओमर अब्दुला म्हणाले होते की, ही आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी तयार झाली, असं असलं तरी लोकसभेत या आघाडीने चमकदार कामगिरी केली, लोकसभेत नरेंद्र मोदी यांचं बहुमत संपवून टाकलं. त्यामुळे ही आघाडी टिकली पाहिजे. संसदेच्या बाहेरही आम्ही काम केलं पाहिजे”.
“ज्याप्रकारे हुकुमशाही पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे ही बाब चिंताजनक आहे. आमच्या आघाडीतील मोठा पक्ष म्हणून ही जबाबदारी सर्वात जास्त काँग्रेस नेतृत्त्वाची आहे. ही त्यांनीच घ्यायला पाहिजे”.
“एकमेकांविरोधात निवडणुका लढणे काही चुकीचं नाही, पण असं करताना आपण आपल्या एकेकाळच्या सहकाऱ्यांवर, भविष्यात लोकसभेला एकत्र येणार आहोत असं चित्र असेल तर त्यांना अगदी देशद्रोही ठरवण्यापर्यंत कोणीही जाऊ नये, उद्धव ठाकरेंची भूमिका आहे”.
अमित शाहांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजपची रोजीरोटी आहे. दगाफटका कोणी केला, गद्दारांना सोबत घेऊन सरकार बनवलं आणि कोण दगाफटक्याच्या गोष्टी करत आहेत. या देशात जर कोणी दगाफटका, बेईमानीला खतपाणी घातलं असेल तर ते भाजपने आणि खासकरुन नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी घातलं”.