• Fri. Jan 10th, 2025

    राज्यातील हजारो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश, जनतेने खरी शिवसेना कोणाची याचा फैसला केलाय, उपमुख्यमंत्र्यांचा टोला

    राज्यातील हजारो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश, जनतेने खरी शिवसेना कोणाची याचा फैसला केलाय, उपमुख्यमंत्र्यांचा टोला

    Thane News : ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत हजारो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयी करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    विनित जांगळे, ठाणे : विधानसभेत घवघवीत यश मिळवणाऱ्या शिवसेना पक्षात आज राज्यातील विविध जिल्हयांतील हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. ठाण्यातील आनंद आश्रम येथे पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

    ठाणे, पालघर, अकोला, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर पुणे, अहिल्यानगर, नागपूर या जिल्ह्यांतील उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आम आदमी पार्टीतील हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेकडो सरपंचांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेची ग्रामीण भागातील पकड मजबूत झाली.
    ज्यांनी हिंदुस्थानच्या विरोधात काम केले अशा लोकांची स्मारके, स्थळे आपण का संरक्षित करतोय? नरेश म्हस्केंचा सवाल

    लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हीच ओळख मोठं पद – उपमुख्यमंत्री

    यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील अडीच वर्षात महायुती सरकारने प्रचंड काम केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आहोत. विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर दिले, त्यामुळेच महाराष्ट्रात महायुतीची सरकार अभूतपूर्व बहुमताने सत्तेत आले. ते पुढे म्हणाले की, लाडक्या बहिणींनी निवडणुकीत सावत्र भावांना जागा दाखवली. फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना घरी बसवले. कोणत्याही पदापेक्षा २ कोटी ३९ लाख लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हीच ओळख माझ्यासाठी मोठं पद आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
    महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवार महायुतीच्या संपर्कात, कोकणात ठाकरे गटाला शिंदेंचा धक्का?

    ‘जनतेने खरी शिवसेना कोणाची याचा फैसला केला’

    काही लोक म्हणत होते निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट झाले आता जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि खरी शिवसेना कोणाची हे जनता ठरवेल. जनतेने शिवसेनेचे ५७ आमदार आणि अपक्ष ३ असे एकूण ६० आमदार निवडून दिले आणि खरी शिवसेना कोणाची याचा फैसला केला, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

    आपल्या भागाचा विकास होईस, मुलभूत सोयी सुविधा केल्या जातील. आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पक्ष प्रवेश केलेल्या हजारो कार्यकर्त्यांना यावेळी दिली. शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. बाळासाहेब आपल्या सवंगड्यांना सहकारी समजायचे तर काहीजण पक्षातील सहकाऱ्यांना घरगडी समजायला लागले होते, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला.

    विधानसभेप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. या पक्ष सोहळ्यात यावेळी खासदार नरेश म्हस्के, खासदार संदिपान भुमरे, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, आमदार शांताराम मोरे, रवींद्र फाटक आदि उपस्थित होते.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed