मुंबई, दि. 9 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील वय वर्ष 18 ते 45 वयोगटातील उमेदवारांचे कौशल्य वृद्धिंगत करून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त करून देण्याकरिता किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2024 -25 ही योजना, जिल्हा नियोजन समितीतर्फे कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. सन 2024-25 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील 3300 उमेदवारांचे कौशल्य वृद्धिंगत करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने अधिकृत संस्थांना तुकडी वाटप करण्यात आले आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती मुंबई उपनगर तर्फे किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2024 -25 तुकडी वाटपाकरिताची बैठक झाली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा नियोजन अधिकारी संजय शिंदे, महासंचालक (प्रशिक्षण) (DGT) नरेशकुमार चव्हाण, सरकारी कामगार अधिकारी प्रेरणा मोहने, जिल्हा अग्रणी बँकचे युवराज शिंदे, एसएमइ चेंबर ऑफ इंडियाचे मनेश भगत इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
कृषी, एरोस्पेस अँड एवियेशन, ऑटोमोटिव, ब्युटी अँड वेलनेस, कॅपिटल गुड्स, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, जेम्स अँड ज्वेलरी, हेल्थकेअर, इन्स्ट्रुमेंट, आयटीआय, माध्यम आणि मनोरंजन, पर्यटन आणि आदरातिथ्य, ऊर्जा या क्षेत्रांमध्ये उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील दहिसर, बोरीवली, कांदीवली, मालाड, अंधेरी, गोवंडी, चेंबूर, मुलूंड, कुर्ला या भागातील प्रशिक्षण संस्थांमध्ये किमान कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील रहिवासी व किमान दहावी व बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. योजनेचा लाभ घेण्याकरिता उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर 175, श्रेयस चेंबर्स, 1 ला माळा, डॉ.डी.एन रोड, फोर्ट, मुंबई 400001 दूरध्वनी क्र. (022-22626440) येथे संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र शैलेश भगत यांनी केले आहे.
****
संध्या गरवारे/विसंअ/