Santosh Deshmukh Murder Case: परळीत मनोज जरांगेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय मुंडेंविरोधात चुकीची भाषा वापरल्याने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
जरांगेंकडून धनंजय मुंडेंबाबत वादग्रस्त वक्तव्य
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथे झालेल्या मूक मोर्चात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी भाषण करताना मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्याचबरोबर, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन बोलताना जरांगे म्हणाले की, संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना त्रास झाला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. याच भाषणात बोलताना “मुंडया-फिंड्या, हरामखोर अवलादी” असे शब्दप्रयोगही केले होते. यावरून मुंडे समर्थकांमधून मोठा संताप व्यक्त केला जात होता.
परळी पोलिसांत जरांगेंविरोधात गुन्हा दाखल
याच अनुषंगाने आज सकाळपासून परळी पोलीस ठाण्यासमोर शेकडोच्या संख्येने धनंजय मुंडे समर्थक जमा झाले होत. मनोज जरांगे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यासमोरच या जमावाने ठिय्या धरला होता. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नसल्याची आक्रमक भूमिका या शेकडो समर्थकांनी घेतली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने तक्रार अर्ज घेत त्याबाबतची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर अखेर तुकाराम बाबुराव आघाव यांच्या तक्रारीवरून मनोज जरांगे यांच्या विरुद्ध परळी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १७४ अंतर्गत असंज्ञेय अपराध (एनसीआर) अशा प्रकारचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास परळी पोलीस करीत आहेत.