Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ३ आरोपींना १४ दिवसांची सीआयडी सुनावण्यात आलेली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनावणे या तिघांना आज कोर्टात हजर करण्यात आलं.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ९ डिसेंबरला झाली. प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय ठरताच आरोपी फरार झाले. सात आरोपींपैकी चार जणांना आधीच अटक झालेली होती. त्यानंतर घुले आणि सांगळेला आज पहाटे पुण्याच्या बालेवाडीतून अटक झाली. डॉक्टर संभाजी वायभसेनं दिलेल्या माहितीवरुन दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. तर कल्याणमध्ये ऊसाच्या गाडीवरुन सोनावणेच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आता या तिघांना १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
डॉक्टरकडून टिप, पुण्यात धाड, सरपंचांच्या हत्येचा मास्टरमाईंड गजाआड; घुलेच्या अटकेचा थरार
देशमुख हत्या प्रकरणात मकोका लावण्यात यावा, अशी मागणी सुरुवातीपासूनच होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० डिसेंबरला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना आरोपींना मकोका लावण्यात येईल, अशी माहिती दिली होती. आज घुले, सांगळे, सोनावणेंना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी तपास अधिकारी, सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. खंडणी, मारहाण, अपहरण, हत्या प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारी असल्याचं तपासातून समोर आल्याचं कोर्टाला सांगण्यात आलं. त्यानंतर कोर्टानं तीन आरोपींना १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
सरपंच अपहरण, हत्या प्रकरणात सहभाग असलेले आरोपी टोळीनं दहशत पसरवत होते. सगळे गुन्हे ते टोळीच्या माध्यमातून करत होते. त्याचा परिणाम परिसरातील उद्योगधंदे, व्यवसायांवर झाला. आरोपींवर १०-१० गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ते सराईत गुन्हेगार आहेत. या प्रकरणात संघटित गुन्हेगारीचे पुरावे असल्याचा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला. त्यानंतर कोर्टानं तिन्ही आरोपींना प्रत्येकी १४ दिवसांची कोठडी सुनावली.
अंत्यविधीला गैरहजर, संशय वाढला; देशमुखांच्या हत्येनंतर नॉट रिचेबल झालेले डॉ. वायभसे कोण?
कोठडी सुनावण्यात आलेल्या सुदर्शन घुलेचं नाव या प्रकरणातील सगळ्या एफआयआरमध्ये आहे. आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण, खंडणी, सरपंच अपहरण, हत्या या सगळ्या प्रकरणात घुले आरोपी आहे. तर या गुन्ह्यात सांगळे साथीदार होता. कल्याणमधून अटक करण्यात आलेल्या सोनावणेनं संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती हल्लेखोरांना कळवली.