• Thu. Jan 9th, 2025

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दीपर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 3, 2025
    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दीपर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    सातारा दि.०३ (जिमाका) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आणखी पाच वर्षांनी द्विशताब्दी साजरी होणार आहे. त्यापूर्वी त्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करा. त्यासाठी प्रशासनाने १० एकर जमिनीचे तात्काळ अधिग्रहण करावे, असे निर्देश देऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानाला साजेशा भव्य स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त नायगाव, ता. खंडाळा येथे आयोजित सावित्रीमाई जयंती उत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले,  ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे,  आमदार सर्वश्री छगन भुजबळ, अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे,  जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले आदी मान्यवर उपस्थित होते.

    महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेल्या सन्मार्गावर चालून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचे काम करू, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जिवंत स्मारक म्हणजे सक्षम महिला होय. त्यांचा विचार समाजात तळागाळापर्यंत रुजवून स्वयंपूर्ण व स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभारणाऱ्या महिला घडविण्याचे कार्य शासन करेल. महिलांना 33 टक्के आरक्षण मिळाल्याने पुढील काळात निश्चितपणे महिलाराज येईल.  केंद्र सरकारच्या लखपतीदीदींसारख्या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या दोन तीन वर्षात 50 लाख महिलांना लखपती दीदी घडविण्याचे कार्य शासनाने हाती घेतले आहे.

    या देशावर, महाराष्ट्रावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे फार मोठे उपकार आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या काळात स्त्रियांना गुलामाप्रमाणे वागणूक मिळत होती त्या काळात समाजातील विषमता दूर करून समतेचे बीजारोपण करण्याचे कार्य फुले दांपत्याने केले. शिव्या शाप, शेण गोळे खावे लागले तरी सावित्रीबाई फुले यांनी न डगमगता स्त्रियांना गुलामीतून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची ज्योत पेटवली. या कार्यात महात्मा फुले हे हिमालयाप्रमाणे त्यांच्या सोबत होते. त्यांनी विधवांच्या केशवपन, बालहत्या यासारख्या बाबींना कृतिशील विरोध केला. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. समाज परिवर्तनाच्या अनेक चळवळींचे नेतृत्व सावित्रीबाई फुले यांनी केले, याची कबुली स्वतः महात्मा फुले यांनी अनेकदा दिलेली आहे. थोर माणसांचे कार्य कधीही संपत नाही, त्यांचे स्मारक उभा करत असताना पुतळ्यासोबतच विचारांचेही स्मारक झाले पाहिजे, असेही मत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी योवळी व्यक्त केले.

    यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले.  स्त्री शिक्षणाची सुरवात झाल्यामुळे आज महिला समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात यशाची शिखरे गाठत आहेत.  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थान असलेले हे गाव ग्रामविकास मंत्री म्हणून मी दत्तक घेत आहे. यापुढे कामासाठी निवेदने येणार नाहीत, या पद्धतीने नायगावचा विकास केला जाईल. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव प्रेरणास्थान असून त्यांचे विचार उर्जा देणारे आहेत. त्यांच्या सन्मानाला साजेसे स्मारक उभारण्यासाठी दहा एकर जागा शासनाने खरेदी करावी व स्मारकासाठी 125 कोटी रुपये द्यावेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विकास आराखडा तातडीने मंजूर करावा. स्मारकाचे काम मंजूर झाल्यानंतर हे स्मारक दोन वर्षाच्या आत उभे राहील. या स्मारकामध्ये महिला सक्षमीकरणासाठी विविध प्रशिक्षणे देण्यात येतील. महिलांना स्वत:च्या पायावर उभे करुन आर्थिक सक्षम केले जाईल, अशी ग्वाहीही मंत्री श्री. गोरे यांनी दिली.

    मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील म्हणाले की, १ जानेवारी १८४८ ला मुलींच्या पहिल्या शाळेची सुरुवात करून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी वर्षानुवर्ष प्रगतीपासून दूर असणाऱ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यास सुरुवात केली. फुले दांपत्याने समाजाला दिशा दाखवण्याबरोबरच अंधकार व अंधश्रद्धेतून बाहेर काढले. आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत याचे श्रेय फुले दांपत्याचे आहे.  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगावच्या विकासासाठी आतापर्यंत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले आहेत, यापुढेही ते अखंड सुरू राहतील. नायगाव हे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र व्हावे, यासाठी प्रयत्न केले जातील.

    आमदार छगन भुजबळ यांनी फुले दांपत्याचा विरोध हा ब्राह्मण्यवादाला होता, कोणत्या जातीपातीला नव्हता असे सांगून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या जीवनातील महत्त्वाची ठिकाणे जोडण्याचे काम मार्गी त्वरित लावावे, तसेच सावित्रीबाई फुले यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार हा 3 जानेवारी रोजी नायगाव येथील कार्यक्रमातच दिला जावा, फुले दांपत्याच्या साहित्याचे पुनर्मुद्रण व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी असलेल्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यांनतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टीचीही पाहणी केली. या ठिकाणी स्मारक उभारणी आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.

    या कार्यक्रमात विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये ब वर्ग पर्यटन क्षेत्रांतर्गत उभारण्यात आलेल्या शासकीय प्रतिक्षालयाचे उद्घाटन, जलजीवन मिशन अंतर्गत वॉटर एटीएमचे उद्घाटन, महाज्योतीच्या विविध योजनांच्या प्रदर्शन दालनांचे उद्घाटन, महिला बचतगटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्री स्टॉल्सचे उद्घाटन, जिल्हा परिषद शाळेतील निबंध चित्रकला व वकृत्त्व, स्पर्धेतील विजेते, विद्यार्थी यांच्या बक्षिस वितरण, यशस्वी महिलांचा सन्मान करण्यात आला.

    या कार्यक्रमास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार मदन भोसले, सरपंच स्वाती जमदाडे, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, नितीन घुले यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    ०००

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed