Nashik Crime News : नाशिकमध्ये थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पिता-पुत्राने आपल्या शेजाऱ्यावरच कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे यानंतर मृताचे कापलेले डोके घेऊन त्यांनी पोलिसांत जाऊन आत्मसमर्पण केले आहे.
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील ननाशी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. ४० वर्षीय सुरेश बोके यांनी आपल्या मुलासह शेजारी असलेल्या गुलाब रामचंद्र वाघमारेची हत्या केली. यानंतर ते मयताचे डोके आणि खुनाची शस्त्रे घेऊन ननाशी चौकी पोलिस ठाण्यात पोहोचले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. तर आरोपी आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबात अनेक दिवसांपासून वाद सुरू होते, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, त्यांनी ३१ डिसेंबरला एकमेकांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली होती. दुसऱ्या दिवशी आरोपीच्या मुलीला पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून बोके आणि त्याच्या मुलाने वाघमारेची हत्या केली.
या धक्कादायक घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. मृत वाघमारे यांची पत्नी मीनाबाई हिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी रात्री पेठ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम १०३(१), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला. तर 351(2)(3) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.