मुंबई, दि. 2 : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन समाजातील दुर्बल, वंचित आणि मागासलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणावे, असे निर्देश नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाचा आढावा घेतला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या महासंचालक प्रेरणा देशभ्रतार, समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी, सहसचिव सो.ना.बागुल, महात्मा फुले विकास महामंडळाचे लहुराज माळी व अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की, सामाजिक न्याय विभागाच्या योजना स्थानिक पातळीवर सुलभतेने पोहचविण्यावर भर द्यावा. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची कामे गतीने करावी. यावेळी 2025-मधील अर्थसंकल्पीय तरतूद, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ,विभागातील रिक्त पदे, वसतिगृहे, रमाई घरकुल योजनांचा तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
0000000
मोहिनी राणे/स.सं