• Sat. Jan 4th, 2025
    शरद पवार-अजित पवार एकत्र यावेत, दादांच्या मातोश्रींचे पांडुरंगाला साकडे, घरातील वाद संपूदे…

    Ajit Pawar mother visits Pandharpur : पवार कुटुंबातील वाद संपूदेत, अशी मनोकामना अजितदादांच्या मातोश्रींनी पांडुरंगाच्या चरणी लीन होत केली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. आशाताई पवार यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं. नववर्षाच्या सुरुवातीला सकारात्मक ऊर्जा मिळावी यासाठी त्यांनी देवदर्शन केलं. यावेळी कुटुंबातील वाद संपूदेत, अशी मनोकामना त्यांनी पांडुरंगाच्या चरणी लीन होत केली.

    ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवशी अजित पवार यांनी दिल्लीतील निवासस्थानी सहकुटुंब भेट घेत परिवारातील फूट कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. त्यानंतर राष्ट्रवादीतील नेते आणि कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांमध्ये दोन्ही पवार एकत्र येण्याचा आग्रह वाढला. अगदी रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही जाहीर इच्छा बोलून दाखवली होती.

    आशाताई काय म्हणाल्या?

    अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंढरपूर गाठून विठ्ठलाचं दर्शन घेतलं. “छान मागितले आशीर्वाद, देवा माझ्या दादाला, सर्वांना नवं वर्ष चांगलं सुखी सुखी जाऊ देत. घरातील सगळे वाद संपू देत, असं पांडुरंगाला सांगितलं. दादाच्या मागची सगळी पीडा जाऊ देत” असं मागणं विठुरायाच्या चरणी मागितल्याचं आशाताई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत असं वाटतं, का असं पत्रकारांनी विचारताच, त्यांनी ‘हो हो’ असं प्रफुल्लित चेहऱ्याने उत्तर दिलं. त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांनीही दोन्ही पवार एकत्र यावेत, अशी मनोकामना व्यक्त केल्याचे दिसते.
    Pradeep Naik : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शरद पवारांना धक्का, तीन टर्म आमदार राहिलेल्या विश्वासू नेत्याचे अकस्मात निधन

    काकांचे शिलेदार दादांच्या भेटीला

    दरम्यान, नागपूर अधिवेशनाच्या वेळी आर आर आबा यांचे सुपुत्र आणि आमदार रोहित आरआर पाटील, तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनीही अजित पवार यांची भेट घेतली होती. दोघेही शरद पवार यांच्या पक्षाचे युवा नेते आहेत. त्याआधी शशिकांत शिंदे यांनीही अजितदादांची भेट घेतली होती.

    Ajit Pawar : शरद पवार-अजित पवार एकत्र यावेत, दादांच्या मातोश्रींचे पांडुरंगाला साकडे, घरातील सगळे वाद संपू देत…

    काकांच्या वाढदिवशी पुतण्या सहकुटुंब भेटीला

    त्याआधी, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी पत्नी खासदार सुनेत्रा पवार, पुत्र पार्थ पवार यांच्यासह दिल्लीला जाऊन काकांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल पटेलही होते. प्रीतिसंगमावर अजित पवार-रोहित पवार यांची योगायोगाने झालेली भेट असो, किंवा सर्वात ताजी म्हणजे अजित दादांचे आमदार चेतन तुपेंनी पुण्यात शरद पवारांची घेतलेली भेट असो. दोन्ही गटांच्या मनोमीलनाचे संकेत वारंवार मिळताना दिसत आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed