Sanjay Jadhav : बहुमत जनतेने दिलेल्या मताचे नसून ईव्हीएमच्या माध्यमातून मताचे ध्रुवीकरण करून मिळविलेले बहुमत आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे.
खासदार संजय जाधव म्हणाले की, विधानसभा निवडणुका लागल्यानंतर सर्वच म्हणत होते की या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. जे भाजपचे आमदार आहेत त्यांना देखील खात्री नव्हती की आपण विजयी होऊ. पण ईव्हीएमच्या माध्यमातून भाजपने मताचे ध्रुवीकरण केले. त्याचबरोबर या निवडणुकीत प्रचंड मोठ्या प्रमाणावर मतदारांना पैशाचे आमिष देण्यात आले आणि म्हणून कोणालाच विश्वास नसलेला विजय महायुतीने मिळवला आहे. ऐन निवडणुकीच्या अगोदर राज्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून थेट महिलांना महिना दीड हजार रुपयेप्रमाणे आमिष देण्यात आले. आता पुढे होणाऱ्या निवडणुकीच्या वेळेस ते पुन्हा एकदा महिलांना पाच हजार रुपये देण्याचे आमिष देऊन निवडणुका का नाही जिंकू शकत? अशा शब्दांत त्यांनी निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘विधानसभा निवडणुकीच्या काळात जिंतूर विधानसभा मतदारसंघातून सध्या मंत्री असलेल्या मेघना बोर्डीकर या निकालात तिसऱ्या नंबर वर असल्याची चर्चा होती. मंत्रि बोर्डीकर यांनी मतदानाच्या अगोदर मतदारांना ५ हजार रुपयांप्रमाणे प्रचंड पैशाचे वाटप केले. काही मतदारांना तर मतदान न करण्याचे पैसे देण्यात आले. आणि त्या विजयी झाल्या. त्यांना स्वतःला विजयाची खात्री नसतानाही पैसा आणि ईव्हीएमच्या बळावर त्या विजयी झाल्या. तसेच गंगाखेड विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेचे उमेदवार विशाल कदम हे विजयी होतील असे सर्वजण म्हणत होते.पण तेथे देखील ईव्हीएमच्या माध्यमातून मतांचे ध्रुवीकरण झाले आणि मतदारांना मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या उमेदवारांनी पैशांचे वाटप केले. आणि त्यामुळे शिवसेना उमेदवार विशाल कदम यांचा पराभव झाला. पण असे असले तरी विशाल कदम यांनी घेतलेली एक लाखांपेक्षा जास्तीची मते ही लक्षणीय’ असल्याचे जाधव म्हणाले.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर हे माझ्यावर टीका करताना म्हणतात की, झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल पाटलांच्या विरोधात मी काम केले. माझे एवढेच म्हणणे आहे की माझ्यावर जो आरोप करायचा आहे तो आमदार राहुल पाटील यांनी करावा तशा प्रकारचे त्यांनी पुरावे देखील दाखवावे तरच मी ते आरोप स्वीकार करेल. आमदार राजेश विटेकर यांनी माझ्यावर आरोप करण्याआधी विचार करावा २०१९ला तुम्ही माझ्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढली त्यावेळेस आमदार राहुल पाटील यांनीच तुम्हाला मदत केल्यामुळे परभणी विधानसभा मतदारसंघातून ३० हजार मतांची लीड तुम्हाला मिळाली होती.
तर ‘जरी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असले तरी आम्हाला काही फरक पडत नाही आत्तापर्यंतच्या झालेल्या सर्वच निवडणुका मी विरोधी पक्षाकडून लढलो आहोत आणि जिंकलो आहोत. येणारी पाच वर्षे आम्ही या सरकारसोबत संघर्ष करू आणि जनतेची कामे सोडवू.’ असेही संजय जाधवांनी नमूद केले.