बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर, व्यापारी अमोल डुबे यांचे परळीमधून अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणामध्ये आता मोठा ट्विस्ट आला आहे. अपहरण झालेल्या व्यापाऱ्याने सुरेश धस यांच्यावरच टीका केली आहे. नेमकं काय म्हणाले जाणून घ्या.
09 डिसेंबरला काही गुन्हेगारांनी माझे अपहरण केले होते. त्यानंतर माझ्या कुटुंबाने संपर्क करताच धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे, सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पोलिसांना सूचना करून माझी लवकरात लवकर सुटका केली. मात्र या घटनेचा आधार घेत सुरेश धस यांनी पीडीत डुबे कुटुंब त्यांना भेटायला जाणार, किती रुपयात सेंटलमेंट झाली अशी चुकीची माहिती माध्यमांना देत आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार केला असल्याचे मत परळीतील अपहरण प्रकारणातील पीडित व्यापारी अमोल डुबे यांनी व्यक्त केला आहे.
आमचे दोन पिढ्यांपासून मुंडे कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नेहमी एकमेकांच्या सुख-दुःखात आम्ही सहभागी असतो. त्यामुळे आमच्या कुटुंबावर संकट येताच मुंडे कुटुंबाने आमची मदत केली. पोलिसांनी माझी तातडीने सुटका तर केलीच शिवाय अवघ्या पाच दिवसात गुन्ह्यातील आरोपींना मुद्दे-मालासह अटक केले, याबद्दल आम्ही पोलिसांचे जाहीर आभार देखील व्यक्त केले आहेत. मात्र या घटनेच्या आडून आ.सुरेश धस हे आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असून, त्यांनी आम्ही त्यांना भेटणार वगैरे अशा स्वरूपाची अत्यंत चुकीची आणि धादांत खोटी माहिती माध्यमांना दिली असून, आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांनी डुबे व मुंडे कुटुंबाच्या अनेक वर्षांच्या संबंधात वितुष्ट आणू नये, असे आवाहनही अमोल डुबे यांनी केले. सुरेश धस यांच्या माध्यमांवरील पेरल्या जात असलेल्या विविध बतावणींच्या अनुषंगाने ही एक चपराक असल्याचे मानले जात आहे.