• Wed. Dec 25th, 2024
    बीडमध्ये इतके शस्त्र परवाने कशासाठी? देशमुख खून प्रकरणानंतर अंजली दमानियांनी यादीच समोर आणली

    Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हत्याकांडामुळे राज्यात संतापाची लाट आहे. बीडमधील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न या प्रकरणामुळे ऐरणीवर आला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हत्याकांडामुळे राज्यात संतापाची लाट आहे. बीडमधील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न या प्रकरणामुळे ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा मास्टर माईंड वाल्मिक कराड असल्याचे आरोप होत आहेत. कराड या मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. त्यामुळे मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील शस्त्रधारकांची यादीच समोर आणली आहे.

    बीडमधील पिस्तुलधारकांच्या संख्येवरुन अंजली दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. ‘बीडमध्ये पिस्तुलांचं थैमान? १२२२ शस्त्र परवानाधारक? इतक्या प्रचंड प्रमाणात शस्त्र परवाने का देण्यात आले? परभणीत ३२ आहेत तर अमरावती ग्रामीणमध्ये २४३ शस्त्र परवाने आहेत. मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर का व कोणाच्या वरदहस्ताने? १२२२ अधिकृत शस्त्र परवाने मग अनधिकृत किती असतील?,’ असा सवाल दमानिया यांनी विचारला.

    ‘वाल्मिक कराड यांच्या नावावर लायसन्स आहे. पण त्यांच्याच गटातले कैलाश फड व निखील फड या दोघांकडे कोणतंही लायसन्स नाही. मी एसपी नवनीत कावत यांना मेसेज पाठवला आहे की त्यांना तात्काळ अटक करावी आणि या कराड गँगला पहिला दणका द्यावा. या सगळ्या परवान्यांची तत्काळ चौकशी लावा,’ अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. ही मागणी करताना दमानिया यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात बीडमधील शस्त्रधारकांची यादी दिसत आहे.

    अंजली दमानिया यांनी सोहम जाधव यांचं एक ट्विट रिट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये एक तरुण पिस्तुलानं गोळीबार करताना दिसत आहे. याच तरुणाचा मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतचा फोटोही ट्विटमध्ये आहे. जाधव यांचं ट्विट रिट्विट करताना दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना काही प्रश्न विचारले आहेत. ‘धनंजय मुंडे…… कोण आहे हा ? कार्यकर्ता आहे तुमचा? उत्तर हवे आहे. सामान्य माणसात दहशत निर्माण करायला हे असे कार्यकर्ते लागतात तुम्हाला?,’ अशी प्रश्नांची सरबत्ती दमानिया यांनी केली आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed