• Thu. Dec 26th, 2024
    १९९३च्या बॉम्बस्फोटात भाऊ गेला, आता दुसऱ्या भावाचाही गोव्यात दुर्दैवी अंत; बोट दुर्घटनेने कोकणचा सुपुत्र हिरावला

    Ratnagiri News : मूळचे कोकणवासीय मात्र सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या खेड तालुक्यातील ऐनवरे येथील पर्यटकाचा गोव्यामध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर त्यांचा एक भाऊ यांचाही १९९३ साली मुंबई येथील बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता.

    Lipi

    प्रसाद रानडे, रत्नागिरी : मूळचे कोकणवासीय मात्र सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या खेड तालुक्यातील ऐनवरे येथील पर्यटकाचा गोव्यामध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा पर्यटकांनी फुलले आहे. किनारी भाग पर्यटकांच्या उपस्थितीमुळे गजबजलेला आहे. यादरम्यान कळंगूट येथे पर्यटकांना जलसफारीवर घेऊन गेलेली बोट उलटल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुर्घटनेत सुर्यकांत पोफळकर (४५, रा. खेड रत्नागिरी) यांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या पाच वर्षीय मुलीसह पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गोवा वैद्यकिय इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    खेड तालुक्यातील पोफळकर, चिंचविलकर व हंबीर या कुटूंबांमधील १३ जण गोव्यात नाताळच्या सुट्टीनिमित्त आले होते. मूळचे खेड तालुक्यातील ऐनवरे गावातील असलेले सूर्यकांत पोपळकर हे मुंबई कुर्ला येथे येथे वास्तव्य आहेत. ते पर्यटनासाठी गोव्या येथे गेले होते. गणेशोत्सवासाठी ते न चुकता गावी येत असत यावर्षीही ते दीड दिवसाच्या गणपतीसाठी आवर्जून गावी आले होते. हीच त्यांची गावची शेवटची भेट ठरली आहे, अशी हृदयद्रावक आठवण ग्रामस्थांनी सांगितली.

    सूर्यकांत पोपळकर यांच्या मृत्यूने खेड तालुक्यातील ऐनवरे गावावर शोककळा पसरली आहे. यापूर्वी त्यांचा एक भाऊ रवींद्र पोफळकर यांचाही १९९३ साली मुंबई येथील बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता. पोफळकर कुटुंबीयांना हा बसलेला दुसरा मोठा धक्का आहे. यामुळे पोफळकर कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    २५ डिसेंबरला सकाळी ११ च्या सुमारास बोट उलटल्याची दुर्घटना घडली. १३ पर्यटकांना घेऊन जॉन वॉटर स्पोर्टस् ही जलसफरी करणारी बोट समुद्रात उतरली. सुमारे शंभर मीटर अंतरावर या बोटचे इंजिन वाळूत रुतून इंजिन बंद पडले. त्याचवेळी समुद्राच्या लाटेची जोरदार धडक बसल्याने बोट पाण्यात कलंडली. तत्पुर्वी बोटने याठिकाणी एक गोलाकार फेरी मारली होती व दुसरी फेरी मारतेवेळी ही दुर्घटना घडली.

    बोट कलंडल्याने सर्व पर्यटक प्रवासी पाण्यात फेकले गेले. या अपघातात सुर्यकांत पोफळकर (४५) यांचे तोंड बोटीला धडकले व ते रक्तबंबाळ होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. सर्व प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातले होते. अपघात घडताच किनाऱ्यावरील बोटवाल्यांसह जीवरक्षक, किनारी व पर्यटक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बुडत्या पर्यटकांसह बोटीवरील दोघा कर्मचाऱ्यांना पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. जीवरक्षक तसेच रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी या पर्यटकांना सीपीआर दिला व सर्वांना कांदोळी येथील प्राथमिक केंद्रात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी सूर्यकांत पोफळकर यांना मृत घोषित केले.

    दरम्यान पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून गोमेकॉत हलविले. तर इतरांना उपचारार्थानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच किनारी सुरक्षा पोलीस निरिक्षकांनी मदतकार्य सुरु केले. किनारी सुरक्षा पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनीही घटनास्थळी तसेच गोमेकॉत भेट देऊन जखमी पर्यटकांच्या प्रकृतीचा आढावा घेतला आहे.

    दरम्यान या दुर्दैवी घटनेत खेड तालुक्यातील सूर्यकांत पोफळकर यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या छोट्या कन्येवर आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. तर पत्नी व मोठी मुलगी या सुखरूप आहेत. त्यांच्या पश्चात एक मोठा भाऊ, बहीण, पत्नी एक मुलगी असा मोठा परिवार आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed