• Wed. Dec 25th, 2024
    प्रशासनाला लाचखोरीची कीड! वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने मागितली लाखोंची लाच, गु्न्हा दाखल

    Palghar Bribe Taking : मांडवी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने २० लाख रुपये लाच मागितल्याची घटना उघड झाली आहे. तक्रारदाराकडून २० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी मांडवी परिक्षेत्र अधिकाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Lipi

    पालघर : मांडवी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने २० लाख रुपये लाच मागितल्याची घटना उघड झाली आहे. तक्रारदाराकडून २० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी मांडवी परिक्षेत्र अधिकारी संदीप तुकाराम चौरे (वय ३८) यांच्यासह दोन सहकारी अशा तिघांविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या ताब्यावरुन हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.

    वसई तालुक्यातील ससूनवघर हद्दीत तक्रारदार यांची विस्तारित सासुपाडा गावठाण याठिकाणी असलेली जमीन वनविभागाच्या क्षेत्रात येते. सन २००७ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वनविभाग बोरिवली यांनी सदरची जमीन ताब्यात घेऊन सील केली होती. याप्रकरणी मांडवी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने वरिष्ठ कार्यालयास सहाय्यक वनसंरक्षक, घोलविरा, डहाणू यांच्याशी बोलून तक्रारदार यांच्या निर्णय बाजूने देण्याकरिता व तक्रारदार यांची जप्त जमिनीचा ताबा मिळवून देण्याकरिता कागदोपत्री मदत करण्याच्या मोबदल्यात २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर येथे तक्रार दाखल केली होती.

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची दखल घेत कागदपत्रांची आणि या प्रकाराची पडताळणी केली. कागदोपत्री मदत करण्याची तयारी दाखवत मांडवी वनपरिक्षेत्र अधिकारी लाच स्वीकारणार असल्याचे पडताळणीतून समोर आले.

    वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप तुकाराम चौरे यांनी चंद्रकांत पाटील व अनोळखी इसमाशी बोलून तक्रारदाराकडून लाच स्वीकारण्याबाबत बोलणी करण्यास सांगितले. संदीप चौरे याच्या वतीने चंद्रकांत पाटील या खाजगी इसमाने २० लाख रुपयांपैकी दहा लाख रुपये काम होण्यापूर्वी व दहा लाख रुपये काम झाल्यानंतर देण्याचे ठरले. त्यानुसार चौरे व त्याचा खाजगी हस्तक चंद्रकांत पाटील वसई पूर्व, एव्हरशाईन परिसरात लाच स्वीकारण्यासाठी आले होते. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्याची खबर लागल्याने लाच घेण्यासाठी आलेल्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

    लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीत वनपरिक्षेत्र अधिकारी व त्याच्या खाजगी हस्तकाने लाच मागितल्याचे व लाच घेण्यासाठी घटनास्थळी हजर असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात मांडवी वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप तुकाराम चौरे व चंद्रकांत पाटील आणि एका अनोळखी इसमाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायदासन 1988 (सुधारित अधिनियम 2018) च्या कलम 7, 12 अन्वये मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर पोलीस उपाधीक्षक हर्षल चव्हाण करीत आहेत आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed