98th Marathi Sahitya Sammelan: संमेलनस्थळाचे नाव आता बदलणार नाही यावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ठाम आहे. मात्र या नावांचा समावेश इतर कोणत्या पद्धतीने करता येईल यावर विचार सुरू आहे.
संमेलनस्थळाचे नाव आता बदलणार नाही यावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ठाम आहे. मात्र या नावांचा समावेश इतर कोणत्या पद्धतीने करता येईल यावर विचार सुरू आहे. या संदर्भात ३ जानेवारी रोजी होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीमध्ये विचार करण्यात येईल. मात्र संमेलनाचा मूळ उद्देश या वादामध्ये हरवू नये तसेच समाजातील वातावरण खराब होईल अशाही मागण्या येऊ नयेत, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे.
संमेलनस्थळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वगळता इतर कुणाचेही नाव आता देण्यात येणार नाही, असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संमेलनस्थळाचे नाव बदलण्यासंदर्भात महामंडळाकडे थेट मागणी झाली नसून आयोजक संस्थेकडे फोन आले आहेत, असे महामंडळाकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर आयोजक संस्थेचे पदाधिकारी आणि त्यांचे काही नातेवाईक यांनाही मोठ्या प्रमाणात गेल्या दोन दिवसांमध्ये फोन गेल्याचे सरहद या संमेलन आयोजक संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी सांगितले. यातील ९० टक्के फोन विनंतीचे होते असेही ते म्हणाले. संमेलनस्थळाबद्दल आलेल्या धमकीच्या फोनसंदर्भात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसून त्यांच्या मागणीबद्दल आयोजक संस्था, महामंडळ यांना पत्र पाठवण्यास सांगण्यात आले आहे.
आयोजक संस्थेकडे आलेल्या मागण्यांमध्ये काहींनी नवी दिल्लीमध्ये संमेलन होत असल्याने महाराष्ट्रासाठी योगदान दिलेल्या साहित्यिक, कलाकारांचा सन्मान व्हावा असे मत व्यक्त केले आहे. काहींनी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास, बहिणाबाई चौधरी, आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, वि. वा. शिरवाडकर आणि माजी संमेलनाध्यक्ष या सर्व व्यक्तींचे फोटो पोस्टरवर दिसावे अशीही मागणी करण्यात आली आहे. आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचे कार्य दुर्लक्षित राहिले असून त्यांच्या कार्याची आणि बलिदानाची जाणीव सामान्यांना होण्यासाठी संमेलनस्थळी त्यांचा सन्मानाने उल्लेख व्हावा, अशी मागणी आद्यक्रांतिवीर उमाजीराजे नाईक युथ फाऊंडेशनने केली आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांमधून आलेल्या मागण्यांचा विचार करून संमेलनस्थळ, मंडप, मंच या सगळ्याला ही नावे देणे कठीण असल्याने याचा आणखी कोणत्या पद्धतीने विचार करता येईल का याबद्दल विचार सुरू असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी सांगितले. संमेलनामध्ये सर्वांचाच समावेश करून घेण्यात येत आहे. महाराष्ट्रात आज निर्माण झालेली दुहीची परिस्थिती बदलावी, समाज ऐक्याच्या दिशेने पुढे जावा म्हणून नवी दिल्ली येथे संमेलन होत असून यामध्ये विविध प्रभृतींच्या नावाने वाद नकोत, असे नहार म्हणाले.