पुणे, दि.२८: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभास भेट दिल्याच्या घटनेला सन २०२७ मध्ये १०० वर्ष पूर्ण होणार आहेत, या पार्श्वभूमीवर परिसराचा सर्वांगीण विकास करण्याकरीता १०० कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
हवेली तालुक्यातील मौजै पेरणे येथे १ जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या पूर्व तयारीच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्र. समाज कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा बार्टीचे महासंचालक सुनील वारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उप विभागीय अधिकारी यशवंत माने, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, तहसीलदार तृप्ती कोलते, शिरुर गट विकास अधिकारी संदीप ढोके, हवेली गट विकास अधिकारी भूषण जोशी, समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी मंत्री श्री. शिरसाट यांनी विजयस्तंभास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले, यावेळी ते म्हणाले, येत्या १ जानेवारी २०२५ रोजी पेरणे येथे आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत, उत्साहात साजरा करणे सर्वांची जबाबदारी असून या भावनेने प्रशासनास सहकार्य करावे.
दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी आतापर्यंत १४ कोटी रुपयाहून अधिक निधी खर्च करण्यात आलेला आहे. या ठिकाणी राज्यभरातून लाखो अनुयायी येत असल्याने त्यांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. अनुयायींची कोणतीही गैरसोय होणार नाही, त्यांना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी उत्तम नियोजन करावे. विविध सामाजिक संघटनांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना विचारात घेऊन प्रशासनाने कार्यवाही करावी. येत्या काळात परिसराचा कायमस्वरूपी विकास करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल, असेही मंत्री श्री. शिरसाट म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता येणाऱ्या अनुयायांची संख्या विचारात घेऊन सोहळा शांततेत, उत्साहात, सौदर्यपूर्ण वातावरण साजरा करण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. याबाबत प्रशासनाच्या जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पेरणे येथे विविध आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या सूचनाही विचारात घेतल्या जात आहेत. येणाऱ्या अनुयायींना सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.
यावेळी विजयस्तंभ सजावट, प्रकाशव्यवस्था, स्टॉल, मंडप उभारणी, गर्दीचे व्यवस्थापन, अनुयायांचे आगमन आणि प्रयाण व्यवस्था, वाहनतळ, वाहतूक आराखडा, आरोग्य सुविधा, भोजनव्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालय उभारणी, स्वच्छता, बुक स्टॉल, कायदा व सुव्यवस्था, आपत्कालीन प्रसंगी अग्नीशमन वाहनांची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, हिरकणी कक्ष, आपत्ती व्यवस्थापन आदींबाबत माहिती देण्यात आली.
०००