Digital Arrest Case In Mumbai: दिल्ली येथून सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे भासवून मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात डिजिटल अटक करण्यात आल्याचे सांगून दक्षिण मुंबईतील एका वृद्धाकडून तब्बल २० लाख रुपये उकळण्यात आले. तर, मालाडच्या ६८ वर्षीय वृद्धाला पोलिस असल्याचे फोनवर सांगण्यात आले.
हायलाइट्स:
दक्षिण मुंबईत २० लाख रुपये उकळले
मालाडमध्ये साडेआठ लाखांची फसवणूक
सायबर पोलिस ठाण्यांत तक्रारींचे प्रमाण वाढते
मुलगी आणि जावयासोबत मालाड येथे राहणाऱ्या ६८ वर्षीय चंद्रशेखर (बदललेले नाव) यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिस बोलत असल्याचे सांगत चंद्रशेखर यांच्याकडून कुटुंबाची माहिती घेतली. गोयल नावाच्या व्यक्तीने मनी लाँडरिंगचा गुन्हा केला आहे. या गुन्ह्यातील रक्कम वळविण्यासाठी काही बँक खात्यांचा वापर केला असून, त्यातील एक खाते उघडण्यासाठी आपल्या आधारकार्डचा वापर करण्यात आल्याची माहिती पोलिसाने दिली.
तुम्हाला चौकशीसाठी दिल्लीला यावे लागेल आणि सहभाग आढळल्यास अटक होईल. पोलिसाने असे सांगताच चंद्रशेखर प्रचंड घाबरले. अटक टाळायची असेल तर कुणाला संपर्क करू नका आणि दहा लाखांची व्यवस्था करा, असे पोलिसाने सांगितले. त्यावर इतकी रक्कम नसून आठ लाख ६० हजार रुपये खात्यामध्ये जमा असल्याचे चंद्रशेखर म्हणाले. आधी आहे ती रक्कम पाठवा, असे सांगून पोलिसाने बँक खात्याचा तपशील दिला. चंद्रशेखर यांनी ही रक्कम पाठवल्यानंतर पोलिसाने संपर्क तोडला. हा सर्व प्रकार सायंकाळी घरी आल्यावर मुलीला सांगितला. त्यावेळी तिने ही फसवणूक असल्याचे त्यांना सांगितले.
निवृत्त महापालिका अधिकाऱ्याचीही फसवणूक
वर्सोवा येथे वास्तव्यास असलेले मुंबई महापालिकेचे निवृत्त अधिकारीदेखील सायबरचोरांच्या जाळ्यात अडकले. तोतया सीबीआय अधिकाऱ्याने त्यांना व्हिडीओ कॉल करून डिजिटल अटकेत ठेवले. चौकशी करण्याच्या बहाण्याने त्यांना अटक करून तुरुंगात डांबण्याची धमकी दिली. अटक टाळण्यासाठी सहा लाख रुपयांची मागणी केली. अटक टाळण्यासाठी या अधिकाऱ्याने सहा लाख रुपये पाठविले. नातेवाईकांनी ही फसवी अटक असल्याचे सांगितल्यावर त्यांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार केली.

