Sharad Pawar on Santosh Deshmukh : शरद पवारांनी मस्साजोग येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची घोषणा केली. देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधाराला कठोर शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे सर्वसामन्यांना धक्का बसला आहे. बीडमधील घटना ऐकून सभागृह गंभीर झालं, मी त्यांच्या सभागृहात नाही पण ऐकत होतो. या प्रकरणाच्या खोलात गेलं पाहिजे. ज्या सरपंचांनी १५ वर्षे काम केलं त्यांची हत्या केली गेली. हे अतिशय गंभीर आहे, मुख्यमंत्री यांनी आश्वासन आणि रक्कम दिली मात्र याने कुटुंबाची दुःख जावू शकत नाही. दहशतीचे वातावरण आहे याला आपण सर्व जण तोंड देव. देशमुख यांच्या मुलीला बारामतीच्या वस्तिगृहात पाठवा, तिच्या कॉलेजपर्यंतचे सर्व शिक्षण आम्ही करतो, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांनी देशमुख यांच्या परिवाराची भेट घेतली,यावेळी खासदार बजरंग सोनवणे, माजी मंत्री राजेश टोपे आणि आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते. मस्साजोग ग्रामस्थांनी संतोष देशमुख यांच्यासोबत काय घडलं? याचा सविस्तर घटनाक्रम सांगत पोलिसांनी कशी कुचराई केली याबाबत माहिती दिली.
नेमकं काय आहे प्रकरण?
केज तालुक्यामध्ये ०९ डिसेंबरला मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची किडनॅप करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सभागृहात विरोधी आमदारांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आवाज उठवला. या हत्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या वाल्मिक कराड यांचे नाव समोर आले आहे. सभागृहातही आमदारांनी वाल्मिक कराड याला अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना करत परिवाराला १० लाख रूपयांची मदत केली आहे.