Ratnagiri Crime News: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील खरे ढेरे भोसले उच्च महाविद्यालयातील चार प्राध्यापकांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 8 वाजता गोविंद सानप, प्रा. संतोष जाधव व प्रा. अनिल हिरगोंड हे तिघे हिरगोंड यांच्या चारचाकी वाहनाने शृंगारतळीहून गुहागर कॉलेजच्या दिशेने निघाले होते. गुहागर चिपळूण मुख्य रस्त्यावरुन खरे ढेरे भोसले महाविद्यालयाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर त्यांचे वाहन आले. तेव्हाच समोरुन संस्थेचे संचालक संदीप भोसले हे आपल्या चारचाकी वाहनाने येत होते. त्यांनी वाहन थांबवले आणि त्यांनी ४ ते ५ जणांसह मिळून हिरगोंड यांच्या वाहनाजवळ येऊन त्यांना सुनावले. तुम्ही संस्थेच्या विरोधात काम करता, आमचे काम करत नाही, आमच्या विरोधात बाहेर काहीही बोलता, असे बोलून हिरगोंड यांच्या कानाखाली मारली. त्यानंतर प्रा.सानप आणि प्रा.जाधव गाडीतून खाली उतरुन संदीप भोसले यांना असे का करता, आपण बसुन बोलुयात असे सांगत होते. तोपर्यंत त्यांच्यासोबत असलेल्या माणसांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली.
यानंतर प्रा. जाधव यातून वाचण्यासाठी निसर्ग हॉटेलच्या दिशेने पळून गेले. काही वेळाने प्राचार्य महेंद्र गायकवाड त्या ठिकाणी आले. त्यांच्यादेखत पुन्हा प्राध्यापकांना मारहाण सुरु झाली. याचवेळी प्रा. निळकंठ भालेराव आणि प्रा. बाळासाहेब लबडे मोटरसायकलवरुन आले. प्रा. भालेराव आमची चौकशी करत असताना संदीप भोसले यांनी हा त्याचा म्होरक्या आहे. ह्याला पण घ्या असे सांगत आपल्या सहकाऱ्यांसह प्रा. भालेराव यांनाही रॉडने मारहाण केली. काही वेळात संस्थेचे अध्यक्ष महेश भोसले आले. त्यांनी देखील हे प्राध्यापक हरामखोर आहेत. बाहेरचे असून आमच्या गावात येऊन दादागिरी करतात. आमच्या विरुद्ध लोकांना काहीही सांगतात, यांना धडा शिकवा. असे बोलून शिवगाळी व दमदाटी करु लागले. तेव्हा देखील संदीप भोसले व त्यांच्यासोबत असलेल्या 4-5 जणांनी पुन्हा मारहाण केली. या मारहाणीत प्रा.गोविंद सानप यांच्या डोळ्याला जबर मार लागला आहे. तर प्रा.अनिल हिरगोंड यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी या दोघांना जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष महेश भोसले, सचिव संदिप भोसले, रोहन भोसले आणि ४ ते ५ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. तर संदीप आत्माराम भोसले, रा.आरे भंडारवाडा, अजित अशोक सुर्वे, रा.आरे भंडारवाडा, राकेश कमळकर साखरकर रा.गुहागर वरचापाट यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. जी.बी. राजे, चिपळूण, मुंबई विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या (BUCTU) राज्य उपाध्यक्षा डॉ. ज्योती पेठकर, मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य प्रा. हणमंत सुतार यांच्यासह लांजा, रत्नागिरी, चिपळूण, खेड, मंडणगड येथील प्राध्यापक गुहागरमध्ये दाखल झाले. गुन्हा दाखल होईपर्यंत ही मंडळी पोलीस ठाण्यात तळ ठोकून होती. प्राध्यापक संघटनेकडून गुहागर येथे शनिवारी निषेध मोर्चा छेडण्यात आला आहे, या मोर्चाला विद्यार्थी व पालकांनी पाठिंबा दर्शवला आहे.