हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, अनिल परब, सचिन अहीर उपस्थित होते.
दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. ती बैठक नव्हती. बैठक ५ मिनिटांची नसते. ती एक अनौपचारिक भेट होती, असं आमदार अहीर यांनी सांगितलं. ‘गेल्या अधिवेशनातही आम्ही सगळे आमदार उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो. आता आम्ही फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. विरोधासाठी विरोध करायची महाराष्ट्राची परंपरा नाही. मुख्यमंत्रिपदाचा मान ठेवायचा असतो. आज योगायोगानं ठाकरे साहेब नागपुरात होते. ही भेट पूर्वनियोजित नव्हती. आपण जाऊन भेटलं पाहिजे अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली. मग आम्ही सगळे फडणवीसांना भेटायला गेलो. यामागे कोणतंही प्लानिंग नव्हतं. तिकडे जे आमदार होते, तेच ठाकरेंसोबत फडणवीसांकडे गेले होते,’ अशी माहिती अहीर यांनी दिली.
Udayanraje Bhosale: पक्षादेश झुगारला, भाजप उदयनराजे भोसलेंना नोटीस पाठवणार, तयारी सुरु; नेमकं प्रकरण काय?
‘उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांचं अभिनंदन केलं. दोघांमध्ये अनौपचारिक गप्पा झाल्या. काय चाललंय, कधी आलात, अशा आशयाच्या गप्पा होत्या. त्यांच्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. तुमच्या हातून महाराष्ट्र हिताचं काम होवो, अशा शुभेच्छा आम्ही त्यांना दिल्या. तुमच्या कामात जर काही त्रुटी, उणिवा असतील तर आम्ही त्या निदर्शनास आणून देऊ, असंही फडणवीसांना सांगितलं,’ अशा शब्दांत अहीर यांनी भेटीत झालेला संवाद कथन केला.
ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा प्रखर हिंदुत्त्वाकडे वळत असताना फडणवीसांची भेट होतेय, याकडे लक्ष वेधलं असता, ‘हिंदुत्त्वाचा मुद्दा कायमच सेनेच्या अजेंड्यावर राहिलेला आहे. ज्या ज्या वेळी असे प्रसंग आले, तेव्हा तेव्हा सेनेनं भूमिका घेतलेली आहे. आता हनुमान मंदिराचा विषयच आला नसता, तर आम्हाला मैदानात उतरण्याची गरजच पडली नसती,’ असं अहीर म्हणाले.
ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, भाजपकडून जबाबदारी कोणाला? ‘शांत’ बसलेल्या नेत्याकडे धुरा?
राजकारणात अशा भेटीगाठी व्हायला हव्यात, अशी अपेक्षा अहीर यांनी व्यक्त केली. ‘मी १९९९ पासून आमदार म्हणून राजकारण पाहतोय. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते होते. ते सकाळी सभागहात विविध मुद्द्यांवरुन भांडायचे. पण संध्याकाळी कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमात भेट झाल्यास एकमेकांबद्दल चांगलं बोलायचे. त्या संस्कृतीची सुरुवात पुन्हा एकदा होतेय असं म्हणण्यास हरकत नाही,’ असं अहीर यांनी म्हटलं.