Kurla Bus Accident Sanjay More: पायाजवळचा तसेच हॅन्डब्रेक असताना संजय ने त्याचा वापर का केला नाही यांसह अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने या अपघातामागे अन्य काही हेतू नव्हता ना, असा संशय पोलिसांना येत असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
कुर्ला येथे सोमवारी रात्री झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला तर ४९ जण जखमी झाले. अनेक वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बसचालक संजय मोरे याला अटक करण्यात आली. संजय याची पोलिस कसून चौकशी करीत असून अपघातामागील नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, प्रत्यक्ष इलेक्ट्रिक बस चालवण्याचे प्रशिक्षण एकच दिवस मिळाले. तेही तीन फेऱ्यांचे, अशी माहिती संजय देत आहे. बसवरील नियंत्रण सुटले आणि ते पुन्हा मला मिळवता आले नाही असे तो चौकशीत सांगत आहे.
Kurla Accident: बायकोला शेवटचा कॉल, रुग्णालयाच्या दारातच सोडले प्राण, कुर्ला अपघातात गायकवाडांचा चटका लावणारा अंत
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संजय मोरेला ३० वर्षांहून अधिक काळ बस चालवण्याचा अनुभव असून एकदाही त्याचे वाहन अपघातग्रस्त झालेले नाही. तसेच २०२० पासून तो गिअर असलेल्या छोट्या बेस्ट बस चालवत आहे. १ डिसेंबर रोजी त्याच्या हाती मोठी इलेक्ट्रिक बस देण्यात आली. आठवडी सुटी वगळता ही बस त्याने किमान आठ दिवस चालवली. अपघात झाला ती त्याची त्या दिवशीची कुर्ला- अंधेरी मार्गावरील तिसरी फेरी होती. हे अंतर सुमारे १०.५ किलोमीटर आहे. त्यावरून सोमवारी त्याने ही बस जाऊन ४२ किलोमीटर अंतर चालवली. तर आठ दिवसात किमान ४०० ते ५०० किलोमीटर अंतर ही बस त्यानं चालवल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
Kurla Accident: आई घरातून ९ वाजता निघाली अन् २० मिनिटांतच…, कुर्ला बस अपघातात फातिमा यांचा दुर्दैवी अंत, मुलाने फोडला टाहो
२० जणांचे जबाब
आठ दिवसांच्या कालावधीत संजय मोरे बाबत काही तक्रारी आहेत का? प्रशिक्षण किती दिवसांचे दिले या तसेच इतर काही प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी बेस्ट प्रशासनाकडे मागितली आहे. या अपघात नियोजित कटाचा भाग होता का, कोणाच्या सांगण्यावरून त्याने हा अपघात घडवला का, किंवा यामागे अन्य काही कारण आहे का? याचा तपास पोलिस करीत अजून वीस हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.