Ex Police Officer Sanjay Pande: बेकायदा तपास करत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये माजी पोलिस महासंचालक संजय पांडेंची चौकशी करण्यात आली.
मुंबईतील व्यावसायिक संजय पुनमिया यांच्या तक्रारीनंतर पांडे यांच्यासह माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील, तत्कालीन पोलिस निरीक्षक मनोहर पाटील, वकील शेखर जगताप, श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल, शरद अग्रवाल यांच्याविरुद्ध खंडणीसह अन्य कलमातंर्गत २६ ऑगस्ट रोजी ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याच पोलिस ठाण्यात २०१६ रोजी दाखल गुन्ह्याचा बेकायदेशीर तपास चालू करत माझ्यासह अन्य व्यावसायिकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आणि पैसे उकळले. शासनाचे खोटे पत्र तयार करुन विशेष सरकारी वकील भासवून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारदार पुनमिया यांनी केला होता. कट कारस्थान करुन निर्दोष नागरिकांची फसवणूक केल्याचे तक्रारीमध्ये नमूद आहे. या गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
Pune Police : पुणे पोलिसांना सलाम, भाजप आमदाराच्या मामाचा खून एका गोष्टीवरून उलगडला, स्वत: आयुक्तांनी सांगितलं
बुधवारी दुपारी १ वाजता संजय पांडे गुन्हे शाखेच्या वागळे युनिटच्या कार्यालयात चौकशीसाठी आले होते. चार वाजता कार्यालयातून बाहेर पडले. पांडे यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. शिवाय, त्यांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. याबाबत पांडे यांना विचारले असता, त्यांनीही जबाब देण्यासाठी आलो होतो, असे सांगितले. मात्र, चार वर्षांनी दाखल झालेल्या या गुन्ह्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.