Kurla Bus Crash: कुर्ला पश्चिमेला असलेल्या बर्वे मार्गावर झालेल्या बेस्ट बस अपघातात ७ जणांचा जीव गेला. या अपघातात ४८ जण जखमी झाले. मोठी बस चालवण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या संजय मोरे नावाच्या चालकाच्या हाती इलेक्ट्रिक बस देण्यात आली.
बेस्टच्या चालकांकडून मर्यादेपेक्षा अधिक तास काम करुन घेतलं जातं, अशा आशयाची तक्रार राज्य मानवाधिकार आयोगाकडे दाखल झालेली आहे. कुर्ला अपघाताची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीदेखील करण्यात आलेली आहे. तीन महिन्यांपूर्वीच बेस्टच्या ताफ्यात आलेली इलेक्ट्रिक बस मोरे सोमवारी रात्री चालवत होता. पॉवर स्टेअरिंगच्या बस चालवण्याचा कोणताही अनुभव त्याच्याकडे नव्हता. बसवरील त्याचं नियंत्रण सुटलं. ती १०० मीटरपर्यंत भरधाव गेली. यावेळी तिनं ३० ते ४० वाहनांना धडक दिली. अनेकांना जखमी केलं.
Kurla Bus Accident: मी पटकन बाजूला झालो; पण शेवटच्या क्षणी एक महिला…; रहिवाशानं सांगितला बाका प्रसंग
या संपूर्ण प्रकरणात दोन वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी मानवाधिकार आयोगाच्या पॅनलकडे धाव घेतली आहे. बेस्ट प्रशासनाकडून चालकांची कोणतीही काळजी घेतली जात नाही. ते अतिशय भीषण परिस्थितीत काम करतात, असं राय आणि मिश्रा यांनी आयोगाला दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे.
‘वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाकण्यात येणाऱ्या दबावामुळे चालकांना मर्यादेपेक्षा जास्त वेळ काम करावं लागतं. त्यांच्या कामाचे तास निश्चित असावेत याबद्दल बेस्ट प्रशासनाला कोणतंही गांभीर्य नाही,’ असं वकिलांनी तक्रारीत म्हटलं आहे. ‘सध्याच्या घडीला बेस्टच्या सेवेत असलेल्या सगळ्या बस चालकांचं वेळापत्रक तपासण्यात यावं. त्यांना ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक तास राबवून घेतलं जातंय का, याची पडताळणी करा,’ अशी मागणी तक्रारीतून करण्यात आलेला आहे.
Kurla Bus Accident: बस मला चिरडणारच होती, तितक्यात…; ‘त्या’ २ सेकंदांमुळे अमन वाचला; अपघाताचा थरार सांगितला
बेस्ट प्रशासनाकडून अतिशय मोठ्या प्रमाणात चुका होत आहेत. त्यांच्याकडून चालकांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं जात आहे. याच गोष्टी अपघातांना जबाबदार आहेत, असं वकिलांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीचे आदेश आयोगानं द्यावेत आणि पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती करण्यात आलेली आहे.