Devendra Fadnavis: विधानसभा निवडणूक निकालानंतर महायुती सरकारचा शपथविधी रखडला. १२ दिवसांनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला.
नव्या मंत्रिमंडळात स्वच्छ, निष्कलंक चेहरे असावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंत्र्यांचा पत्ता कापला जाणार आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल. शिवसेनेच्या पाच नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे. यातील चार जण गेल्या सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता कमी असल्याचं वृत्त नवभारत टाईम्सनं दिलं आहे.
५ वर्षांआधी ‘पॅरेशूट उमेदवारी’, यंदा तिकीटच नाही; CMच्या निकटवर्तीयावर आता मोठी जबाबदारी?
शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे. त्यांच्या पाठोपाठ भुजबळ, मुश्रीफ यांचा पत्ताही कापला गेल्यास महायुती सरकारमध्ये अल्पसंख्याक समाजाचा एकही मंत्री नसेल. देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात व्होट जिहाद, धर्मयुद्ध अशा शब्दांचा, संकल्पनांचा वापर केला होता. त्यामुळे आता ते याच मार्गावर पुढे चालण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत केवळ १० मुस्लिम उमेदवार विजयी झाले. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि शिवसेनेच्या एकाचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, सना मलिक, तर सेनेकडून अब्दुल सत्तार निवडून आले आहेत. या तिघांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यास सरकारमध्ये एकही अल्पसंख्याक चेहरा नसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही एकही अल्पसंख्याक चेहरा नाही. त्यामुळे फडणवीस त्यांच्याच पावलावर पाऊल टाकणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
होमसह ३ महत्त्वाची खाती शिंदेंनी मागितली; DCM कशासाठी आग्रही? खातेवाटप कुठे रखडलं?
विधानसभेला १४९ जागा लढणाऱ्या भाजपनं एकही मुस्लिम उमेदवार दिला नव्हता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगेची घोषणा दिली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक है तो सेफ है असा नारा दिला. या माध्यमातून भाजपनं हिंदू मतांचं ध्रुवीकरण साधलं. आता हाच एक है तो सेफ हैचा नारा भाजपकडून पुढे नेला जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात त्याची झलक दिसण्याची दाट शक्यता आहे.