BMW Car Accident : भरधाव BMW कार रस्त्यावरुन थेट गॅरेजमध्ये घुसली. यात अनेक वाहनांचं नुकसान झालं असून गॅरेज मालकासह दोघे जखमी झाले आहेत. अपघातानंतर कार चालकारा ताब्यात घेण्यात आलं आहे.
अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मांडवा सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ गंभीर जखमी झालेल्या तिघांना इतर वाहन चालकांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेलं. या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार देताना सांगितलं की, चोंढी येथील संदीप विलास गायकवाड, वय ४१ हा आपल्या बीएमडब्ल्यू कार क्र. एम.एच. ०६ बीई २०० ने रविवारी संध्याकाळी अलिबागकडून रेवसकडे जात होता.
साई इन हॉटेलच्या पुढे डे-फार्म जवळील वळणावर आले असता चुकीच्या बाजूने जात रस्त्याच्या कडेला असलेल्या रवी लक्ष्मण पाटील यांच्या दुचाकी गॅरेजच्या शेडमध्ये जोरदार धडक दिली, यामध्ये गॅरेज मालक रवी पाटील (वय ५०) रा. धोकवडे- अलिबाग, मंगेश यशवंत म्हात्रे (वय ५२) रा. आगरसुरे-अलिबाग, सोनू मधु नाईक (वय ४५) रा. किहीम-अलिबाग असे एकूण तिघेजण गंभीर जखमी असून सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले आहे.
भरधाव BMW थेट गॅरेजमध्ये घुसली, तिघे कारखाली; इतर वाहनंही कचाट्यात, पोलही कोसळला; पोलीस चौकशीत….
पोलीस चौकशीत काय समोर
त्याशिवाय BMW च्या अपघातात गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या इतर दुचाकी वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातावेळी बीएमडब्ल्यू कार चालकाने मद्यपान केल्याचे दिसून आले आहे, मद्यधुंद बीएमडब्ल्यू कार चालक संदीप गायकवाड याच्यावर कठोर कारवाईची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. कार चालक संदीप विलास गायकवाड(वय ४१) रा. चोंढी- अलिबाग जि. रायगड यांच्या विरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याची मद्यसेवनसंबंधी वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

