Nashik Agniveer Death : भारतीय सैन्य दलात नुकत्याच भरती झालेला २० वर्षीय प्रशिक्षणार्थी अग्निवीर अश्विन याने नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटरच्या बॅरेकमध्ये आयुष्य संपवलं
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : भारतीय सैन्य दलात नुकत्याच भरती झालेल्या २० वर्षीय प्रशिक्षणार्थी अग्निवीराने नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटरच्या बॅरेकमध्ये आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अश्विन एम . (वय २०, मूळ रा. केरळ) असे मृत अग्निवीराचे नाव आहे. त्याचे सहा महिन्यांपैकी दहा आठवडे प्रशिक्षण पूर्ण झाले होते. धक्कादायक निर्णयामागील कारण अद्याप अस्पष्ट असून उपनगर पोलिसांत याबाबत आकस्मिक मृत्यू नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
आर्मी बॅरेकमध्ये आयुष्याची अखेर
पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १०) सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी आर्टिलरी सेंटरमधील अशोक चक्र गेटजवळील आर्मी बॅरेकमध्ये अश्विनने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच त्याच्या लष्करी सहकाऱ्यांनी तातडीने त्याला खाली उतरवले. त्याला उपचारांसाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लेफ्टनंट कर्नल पंकज कुमार यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
Nashik Crime : चुलत बहिणीच्या लग्नात पतीकडून अपमान; डॉ मनिषा जेजुरकर यांनी जीव दिला नव्हे, हत्येचा संशय; हायकोर्टाच्या निरीक्षणाने मृत्यू प्रकरणात ट्विस्ट
चिठ्ठी सापडली नाही
घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. प्राथमिक तपासात बॉडीजवळ कोणतीही मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी किंवा संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. या प्रकरणी सागर पुंजाराम मुतकुठे यांनी दिलेल्या माहितीवरून उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अश्विन हा मूळचा केरळचा रहिवासी असून, देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून तो अग्निवीर म्हणून सैन्य दलात दाखल झाला होता. प्रशिक्षणाच्या काळातच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याने त्याचे सहकाऱ्यांसह प्रशिक्षकांनी शोक व्यक्त केला.
घटनेची माहिती केरळ येथील त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून, ते नाशिककडे रवाना झाले आहेत. शवविच्छेदन अहवाल, पोलिस तपास आणि लष्करी पातळीवरील प्राथमिक माहिती यानंतरच अश्विनच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. प्रशिक्षणादरम्यान त्याच्यावर कोणता मानसिक, कौटुंबिक किंवा वैयक्तिक तणाव होता का, याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे. सध्या आत्महत्येमागील ठोस कारण समोर आलेले नाही.
Disha Salian : आदित्य ठाकरेंच्या बेकायदा कामांची कुणकुण, दिशाने सुशांतला सगळं सांगितलं, म्हणून जीव गमावला, सतीश सालियन यांचा CBI ला जबाब
सन २०२४ मध्ये दोघांचा मृत्यू
सन २०२४ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक येथील देवळाली आर्टिलरी सेंटर (तोफखाना केंद्र) येथे प्रशिक्षण दरम्यान एका दुर्दैवी अपघातात दोन अग्निवीर जवानांचा मृत्यू झाला होता. ही घटना १० ऑक्टोबर २०२४ रोजी (गुरुवारी दुपारी) नाशिकरोड परिसरातील देवळाली फील्ड फायरिंग रेंज येथे घडली होती. अग्निवीर गोहिल विश्वराज सिंह (वय २० वर्ष) आणि सैफत शिट (वय २१ वर्ष) अशी त्यांची नावे होती. हे दोन्ही जवान मूळचे आर्टिलरी सेंटर, हैदराबाद येथून नाशिकला प्रशिक्षणासाठी आले होते. भारतीय फील्ड गनमधून तोफेचा गोळा डागत असताना अचानक एक तोफेचा गोळा लोड करतानाच ब्लास्ट झाला होता. अपघाताचे नेमके तांत्रिक किंवा मानवी कारण शोधण्यासाठी भारतीय सैन्याने ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश दिले होते.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा