• Fri. Dec 27th, 2024
    लग्नाला येतो, फडणवीसांचा शब्द; कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्र्यांची हजेरी

    Nagar Kopardi Devendra Fadnavis Visits the Sister of the Victim : कोपर्डीतील पीडितेच्या वडिलांचा फडणवीस यांच्याशी घटनेपासूच कायम संपर्क राहिला आहे. त्यातच मधल्या काळात भय्यूजी महाराज यांच्यामुळे हे नाते अधिक घट्ट झाले.

    हायलाइट्स:

    • लग्नाला येतो, मुख्यमंत्र्यांचा शब्द
    • भय्यूजी महाराज यांच्यामुळे हे नाते अधिक घट्ट
    • कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला फडणवीसांची हजेरी
    महाराष्ट्र टाइम्स
    कोपर्डी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती

    नगर : सुमारे आठ वर्षांपूर्वी कोपर्डीतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. यावरून आंदोलनाची ठिणगी पडली. पुढे त्यातूनच मराठा आरक्षणाचा लढा अधिक टोकदार झाला. आधी शांततेत निघालेले मराठा क्रांती मोर्चे आणि त्यानंतर अलीकडे सुरू झालेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन. या सर्व प्रवासात आंदोलकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले फडणवीस यांनी आज कोपर्डी घटनेतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजेरी लावत वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला. नगर आणि पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील टाकळी हाजी या गावात रविवारी दुपारी हा साधा विवाह सोहळा झाला. त्याला फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी हजेरी लावली.कोपर्डी (ता. कर्जत) येथील सुद्रिक कुटुंबातीव मुलीचा विवाह निघोज (ता. पारनेर) येथील वराळ कुटुंबातील मुलाशी झाला. सोयीचे ठिकाण म्हणून लग्न शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे ठेवण्यात आले होते. कोपर्डीतील पीडितेच्या वडिलांचा फडणवीस यांच्याशी घटनेपासूच कायम संपर्क राहिला आहे. त्यातच मधल्या काळात भय्यूजी महाराज यांच्यामुळे हे नाते अधिक घट्ट झाले. त्यामुळे सुद्रिक यांनी आपल्या धाकट्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण फडणवीस यांना पूर्वीच दिले होते. त्यांनी यायचे कबुल केले होते. मधल्या काळात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि कारभारही सुरू केला. मात्र, लग्नाला येतो, असा दिलेला शब्द त्यांनी पाळला. छोट्या गावातील एका साध्या लग्न समारंभाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी फौजफाट्याह हजेरी लावत मोठा संदेश दिला आहे.
    भाजप पुन्हा एकदा ‘शिंदे पॅटर्न’ राबवण्याच्या तयारीत; CMची खुर्ची धोक्यात, मित्रपक्ष भडकला

    यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे, प्रवीण दरेकर, पोपटराव गावडे यांच्यासह भाजपचे नगर व पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी हजर होते. याबद्दल माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, आपल्याला या विवाहाचे निमंत्रण होते, त्यामुळे येथे येऊन वधू-वरांना शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही कुटुंबाला आमच्या शुभेच्छा आहेत.

    सुमारे आठ वर्षांपूर्वी १३ जुलै २०१६ रोजी कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. हे घटना त्यावेळी खूप गाजली. राज्यभर वातावरण तापले होते. त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते. पोलिसांनी आरोपींना अटक केली. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी आरोपींना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. प्रकरण वरिष्ठ न्यायालयात प्रलंबित आहे. मधल्या काळात यातील प्रमुख आरोपीने तुरुंगातच आत्महत्या केली.

    या घटनेतील कुटुंब तेव्हापासून न्यायासाठी पाठपुरावा करीत आहे. या घटनेवरून पुढे मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले. यामुळे या लग्नाला उपस्थित राहून फडणवीस यांनी आपण मराठा समाजसोबत असल्याचा संदेश दिल्याचे मानले जात आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed